‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर, ‘लोकमत’च्या सुशील कदम, प्रशांत खरोटेंना पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 03:40 AM2017-12-08T03:40:55+5:302017-12-08T03:42:00+5:30
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या वेदांत कुलकर्णी व दीपक कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर बाजी मारली आहे.
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या वेदांत कुलकर्णी व दीपक कुंभार यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकावर बाजी मारली आहे. तर मुंबईच्या अंशुमन पोयरेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. ‘लोकमत’ मुंबईचे छायाचित्रकार सुशील कदम आणि नाशिक आवृत्तीचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावण्यात यश मिळवले आहे.
या स्पर्धेत प्रमुख तीन पारितोषिकांसह पाच उत्तेजनार्थ विजेते निवडण्यात आले आहेत. त्यातील उत्तेजनार्थ पारितोषिकांत उस्मानाबादचे राजेंद्र धाराशिवकर, बुलडाण्याचे सुनील बोर्डे, पुण्याचे उमेश निकम यांचा समावेश आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी गुरुवारी हा निकाल जाहीर केला. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे २५, २० आणि १५ हजार रुपयांचे, तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी ३ हजार रुपये प्रदान केले जाणार आहेत.
दरम्यान, प्राप्त छायाचित्रांतून विजेत्यांची निवड आणि प्रदर्शनासाठी दर्जेदार छायाचित्रांची निवड करण्यासाठी ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कामकाज पाहिले. या समितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर, ज्येष्ठ छायाचित्रकार नितीन सोनवणे, संजय पेठे, अनिल छड्डा यांचा समावेश होता.
राज्याचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी एकूण ३ हजार २१० छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यातील दर्जेदार छायाचित्रांचे राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार असून प्रदर्शनाची सुरुवात नागपूर येथून होणार आहे. राज्यभरात या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असे महासंचालनालयाने सांगितले आहे.