500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघिणीला गोळ्या घालण्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 12:45 PM2017-10-12T12:45:31+5:302017-10-12T12:48:32+5:30

नरभक्षक वाघिणीला मारण्याचा वनविभागाचा निर्णय योग्य असल्याचे कोर्टाने नमूद केले असून शिकाऱ्यांच्या गोळ्या तिच्यावर बरसतील हे नक्की झाले आहे

Maharashtra Tigress who traveled 500 kilometers to be killed | 500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघिणीला गोळ्या घालण्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब

500 किलोमीटरचा पल्ला गाठणाऱ्या महाराष्ट्राच्या वाघिणीला गोळ्या घालण्यावर कोर्टाचं शिक्कामोर्तब

Next
ठळक मुद्देया वाघिणीवर या 500 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ठेवण्यात आलेली पाळत ही भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी पाळत ठरण्याची शक्यतानिष्णात शिकाऱ्यांना गुंगारा देत या वाघिणीनं 500 किलोमीटरचा प्रदेश पालथा घातला. या प्रवासात जनावरांवर हल्ला करण्याबरोबरच दोन माणसांचा बळीही तिनं घेतला

नागपूर - चंद्रपूरच्या जंगलातल्या या वाघिणीने गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 500 किलोमीटर्सचा प्रवास केला आहे. मिळेल ती जनावरं मारून खाणाऱ्या या वाघिणीनं दोन माणसांचा जीव घेतला आणि वनविभागानं तिला ठार मारण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिला मारू नये अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे करण्यात आली होती. नरभक्षक वाघिणीला मारण्याचा वनविभागाचा निर्णय योग्य असल्याचे कोर्टाने नमूद केले असून शिकाऱ्यांच्या गोळ्या तिच्यावर बरसतील हे नक्की झाले आहे.

बोरच्या जंगलात 29 जुलै रोजी म्हणजे सुमारे 76 दिवसांपूर्वी या वाघिणीला सोडण्यात आले होते. जंगलं, नद्या नाले, महामार्ग वाटेत येणारी गावं असा प्रवास केलेली ही वाघिण भोरला पुन्हा आली. या परिक्रमेदरम्यानच्या काळात तिनं 500 किलोमीटरचा प्रवास केला. तिच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर असल्यामुळे तिची प्रत्येक हालचाल वनविभागाचे अधिकारी टिपत आहेत. त्यातूनच जनावरांवरील हल्ल्यांसह दोन माणसांच्या मृत्युलाही हीच वाघिण जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. अखेर वनविभागानं नरभक्षक झालेल्या या वाघिणीला संपवण्याचा निर्णय घेतला.

वनविभागाच्या निर्णयाविरोधात केल्या गेलेल्या याचिकेमुळे तिचं आयुष्य काही काळ वाढलं, परंतु या सगळ्याचा थांगपत्ता नसलेल्या या वाघिणीला आता मात्र फार काळ मुक्त फिरता येणार नाही, कारण कुठल्याही क्षणी शिकाऱ्यांची गोळी तिचा वेध घेईल. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार या वाघिणीवर या 500 किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ठेवण्यात आलेली पाळत ही भारतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी पाळत ठरण्याची शक्यता आहे. 10 जुलै रोजी ब्रह्मपुरीच्या जंगलात या वाघिणीला पकडण्यात आले. माणसांवर हल्ला करायच्या तिच्या स्वभावामुळे तिला 29 जुलै रोजी बोरच्या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले. या जंगलात अन्य वाघ नसल्यामुळे तिला पुरेसं खाद्य मिळेल आणि ती इथं राहू शकेल असा कयास होता. मात्र, इथं न थांबता या वाघिणीनं आपला संचार सुरू ठेवला, एवढंच नाही तर तिला पकडण्यासाठी जेसीबी, ट्रॉक्टर्स अन्य सामग्री घेऊन तयार असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही तिनं धूळ चारली. निष्णात शिकाऱ्यांना गुंगारा देत या वाघिणीनं 500 किलोमीटरचा प्रदेश पालथा घातला. या प्रवासात जनावरांवर हल्ला करण्याबरोबरच दोन माणसांचा बळीही तिनं घेतला आहे.

मेळघाट किंवा मध्यप्रदेशातील जंगलांमध्ये ही वाघिण जाण्याची तज्ज्ञांची अपेक्षा होती. मात्र, तिथं जाण्यासाठी वाघिणीसाठी सुरक्षित मार्ग नसल्यामुळं ती गेली नसावी असा अंदाज बांधण्यात येतोय. या वाघिणीच्या या साहसी प्रवासामुळे वाघांच्या सीमा बदलत असल्याचे काही तज्ज्ञ म्हणत आहेत.  अर्थात, कारणं काही असोत, या नरभक्षक वाघिणीच्या नशीबात मात्र आता शिकाऱ्याची गोळी निश्चित झाल्यावर उच्च न्यायालयानं गुरुवारी शिक्कोमेर्तब केलं आहे.

Web Title: Maharashtra Tigress who traveled 500 kilometers to be killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.