महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: ऊसतोड कामगाराचा मुलगा विधानसभेत, भाजपचा 'राम' जिंकला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 08:13 PM2019-10-24T20:13:09+5:302019-10-24T20:13:25+5:30
माळशिरसचे माजी आमदार दिवंगत हनुमंत डोळस यांच्या प्रेरणादायी कथा सर्वांनाच परिचित आहे
मुंबई - माळशिरस मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राम विठ्ठल सातपुते यांना 1 लाख 3 हजार 507 मतं मिळाली असून पराभूत विरोधी उमेदवार उत्तमराव जानकर यांना 1 लाख 917 मते मिळाली आहेत. राम सातपुतेंनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत आमदारकी मिळवल्याने, ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार बनल्याचा आनंद भाजपा समर्थकांकडून व्यक्त होत आहे. तर, आपला पोरगा आमदार झाल्यानं आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झाल्याचं म्हटलं जातंय.
माळशिरसचे माजी आमदार दिवंगत हनुमंत डोळस यांच्या प्रेरणादायी कथा सर्वांनाच परिचित आहे. हॉटेलात काम करणाऱ्या मुलगा ते विधानसभा सदस्य असा डोळस यांचा प्रवास राहिला होता. त्यानंतर, डोळस यांच्याच मतदारसंघातून आता पुन्हा एकदा सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला उमेदवारी देण्यात आली आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपा पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्र्यांकडून राम सातपुते या तरुणाचं नाव पुढे आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राम यांना माळशिरस मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर राम सातपुते यांनीही मोहिते पाटील कुटुंबीयांचा आशीर्वाद घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. त्यात, मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या माळशिरस मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनीही रंगत वाढवली. राम सातपुते यांना राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांचं आव्हान आहे. मात्र, राम सातपुतेंचं नाव समोर येताच जिल्ह्यात एकच चर्चा रंगली. राम सातपुते कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? असा प्रश्न अनेकांना पडला होता.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव-बीड रस्त्यावर डोईठाण नावाच्या गावतील ऊसतोड कामगाराचा हा मुलगा आहे. कुटुंब माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी या दुष्काळी गावातील रहिवाशी. शंकर सहकारी साखर कारखान्याकडे विठ्ठल सातपुते हे 1990 ते 1995 पासून ऊसतोडणीचे काम करत होते. आपल्या मुलावर ही वेळ येऊ नये म्हणून विठ्ठल यांनी राम यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. राम यांनी पुण्यातील विद्यार्थीगृहात मुद्रण तंत्र पदविका आणि त्यानंतर पदवीचे शिक्षण राम यांनी पूर्ण केले. याच दरम्यान, अभाविपशी राम यांचा संपर्क जोडला गेला. त्यानंतर, राम यांनी विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व हाती घेतले. प्रशासनावर धाक दाखवून विद्यार्थी आणि युवकांचे प्रश्न राम यांनी हिरिरीने मांडले. याची दखल घेतच, भाजपाने युवा मोर्चाचे अध्यक्षपद राम यांच्याकडे दिले. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर शहरी नक्षलवाद हा विषय राम यांनी विविध प्रांतांमध्ये जाऊन प्रभावीपणे मांडला. तसेच, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजुंना पैशांची सरकारी मदत मिळवून दिली. विशेष म्हणजे आजही रामचे वडिल आजही त्यांच्या गावी चपला शिवायचे दुकान चालवतात. तर, रामने माळशिरस येथील आपल्या गावी शेतीचं काम करायचं ठरवलंय. आपला मुलगा आमदार होणारंय, याबाबत त्यांच्या आईला अद्यापही कळत नाही. आमदाराने काय काम करायचं असतं हे मला माहित नाही. पण, लोक रामचं कौतुक करतात म्हणजे नक्कीच मोठं काम करणार असेल,असे त्याच्या आई जिजाबाई सातपुते यांनी म्हटलंय. तसेच, राजकारणात जाण्याचा निर्णय रामने घेतला, तेव्हाही आम्ही त्याला विरोध केला नसल्याचं जिजाबाई सांगतात. माळशिरस मतदारसंघात भाजपाने राम सातपुते या तरुण चेहऱ्याला संधी दिल्याने राष्ट्रवादीच्या उत्तम जानकरांसमोर तगडे आव्हान निर्माण झाले होते. दरम्यान, मोहिते पाटील यांनी आजपर्यंत अनेक सामान्य कार्यकर्त्यांमधून नेते घडवले आहेत. राम सातपुतेंच्या नावाने पाटील कुटुंबीयांची ही परंपरा पुढेही चालत राहिली आहे. कारण, आता ऊसतोड कामगाराचा मुलगा विधानसभेत आपली पीडित आणि वंचितांचे प्रश्न मांडणार आहे.