महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेसोबत जाणार का? राष्ट्रवादीच्या यशानंतर पवारांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 03:04 PM2019-10-24T15:04:21+5:302019-10-24T15:04:40+5:30
Maharashtra Election Result 2019: महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणूक निकालात काँग्रेसला 43 तर राष्ट्रवादीला 55 जागांची आघाडी मिळाली आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी निवडणुकीतील निकालावर समाधान मानलं आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत एक्झिट पोलचे आकडे फोल ठरवित काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अनपेक्षित यश मिळविलं आहे. राज्यात सत्ता महायुतीची असली तरी महाआघाडीला चांगलच यश मिळालं आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. या निकालानंतर शरद पवारांनी शिवसेनेसोबत जाणार का? यावर स्पष्टीकरण दिलंय.
महाराष्ट्र विधानसभा 2019 निवडणूक निकालात काँग्रेसला 43 तर राष्ट्रवादीला 55 जागांची आघाडी मिळाली आहे. तर महायुतीत भाजपाला 102 तर शिवसेना 60 जागांवर आघाडी आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महायुतीचं 220 पार जे सुरु होतं ते लोकांनी स्वीकारलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी पेक्षा जास्त जागा जिंकल्या, विरोधी पक्षांनी एकजुटीने काम केलं. सत्तेचा उन्माद लोकांना आवडलं नाही, प्रचारात किती टोकाची मते मांडावी याबद्दलची सीमा पार केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असं पवारांनी सांगितले. पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली. साताराकरांचे विशेष आभार मानतो, साताराला जाऊन श्रीनिवास पाटील आणि तेथील जनतेचे आभार मानणार आहे. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव झाला असा टोला शरद पवारांनी उदयनराजेंना लगावला आहे.
तसेच, पवारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र येऊन पुढील दिशा ठरवतील. मात्र, शिवसेनेसोबत आपण जाणार नाही, अशी स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलंय. त्यामुळे भाजपा-शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करेल, असाच प्राथमिक अंदाज दिसून येतोय.
Nationalist Congress Party (NCP) President, Sharad Pawar: NCP-Congress and other allies will decide together, the future course of action. We will not go with Shiv Sena. #MaharashtraAssemblyPollspic.twitter.com/JAr4WaWFVP
— ANI (@ANI) October 24, 2019