Makar Sankranti 2018 : जाणून घ्या, भारतातील विविध भागात कशी साजरी केली जाते मकरसंक्रांत?
By वैभव देसाई | Published: January 12, 2018 06:49 AM2018-01-12T06:49:33+5:302018-01-12T10:49:07+5:30
मुंबई : मकरसंक्रांत हा हिंदूंचा महत्त्वाचा सण असून, दरवर्षी 14 जानेवारीला भारतीय लोक या सणानिमित्त मोठ्या थाटामाटात जल्लोष करतात. सूर्य ज्या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या तिथीला मकरसंक्रांत साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशीच सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होत असून, दिवस मोठा तर रात्री छोटी असते. असं म्हणतात, मकरसंक्रांतीच्या दिवशी ज्याचा मृत्यू होतो, त्याला पुनर्जन्म प्राप्त न होता तो थेट स्वर्गात प्रवेश करतो.
उत्तर प्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. तर महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. मकरसंक्रांत हा सण भोगी ( 13 जानेवारी), संक्रांत ( 14 जानेवारी) आणि किंक्रांत (15 जानेवारी) अशा तीन टप्प्यात साजरा केला जातो. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून शुभेच्छा दिल्या जातात. मकरसंक्रांत हा सण शांती आणि समृद्धीचं प्रतीक समजला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये लोक डुबकी मारून आंघोळ करतात. या पवित्र नद्यांमध्ये स्थान केल्यामुळे पापांचं नायनाट होतो, अशीही आख्यायिका सांगितली जाते.
पंजाबमधील माघी
पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 'लोहारी' हा सण जल्लोषात साजरा केला जातो. पंजाब या भागात 13 जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो. रब्बी पिकांच्या कापणीशी हा सण संबंधित असतो. संध्याकाळच्या शेकोटीसाठी छोटी मुले घरोघरी जाऊन गाणी म्हणतात, शेकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात. हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा केले जाते. लाहोरीच्या दुस-याच दिवशी माघी मकरसंक्रांत साजरा केला जातो. पंजाबमधील शेतक-यांसाठी हा आर्थिक भरभराटीचा दिवस समजला जातो. पंजाबमध्ये लाहोरीपासूनच पतंगोत्सवाला सुरुवात होते.
तामिळनाडूमधील पोंगल
मकरसंक्रांत हा सण तामिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा केला जातो. त्यालाच भोगी पोंगल असंही संबोधलं जातं. या दिवशी घरातल्या पुरातन वस्तू काढून घरात साफसफाई केली जाते. त्याप्रमाणेच नव्या वस्तूही घेतल्या जातात. तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी, बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी, पावटे-गाजर- हरभरे- वांगी या सर्वांची मिळून भाजी करतात. या भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी. बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते.
पश्चिम बंगालमधला पौष पर्व
पश्चिम बंगालमध्येही मकरसंक्रांत हा मोठ्या थाटात साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये पौष पर्व या नावानं तो साजरा होतो. रब्बी पिकांची कापणी केल्यानंतर पौष पर्वाला सुरुवात होते. पश्चिम बंगालमध्ये गोडधोड खाऊन बंगाली लोक पौष पर्वाचा आनंद एकमेकांसोबत द्विगुणित करतात. या सणानिमित्त भात, नारळ आणि दुधाचं मिश्रणं असलेला पिठा हा पदार्थही बनवला जातो. या सणानिमित्त भाविक गंगा किनारी जाऊन पूजा-अर्चाही करतात.
बिहार आणि झारखंडमधला संक्रांत
बिहार आणि झारखंडमध्येही 14 ते 15 जानेवारी हे दोन दिवस संक्रांत हा सण साजरा केला जातो. ब-याच ठिकाणी पतंग उडवली जातात. तसेच लोक पहाटे नदीत अभ्यंगस्नान करतात. 15 जानेवारीला संक्रांतीनिमित्त एक विशिष्ट पद्धतीची खिचडीही बनवली जाते. चही चुडा, पोहे असे पदार्थही या दिवशी बनवले जातात. या पदार्थांत मीठ आणि साखरचे प्रमाण असते, परंतु पाणी नसते.
गुजरातमधलं उत्तरायण
गुजरातमध्ये उत्तरायण म्हणजे मकरसंक्रांत धूमधडाक्यात साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये विविधरंगी आणि मोठंमोठी पतंग उडवली जातात. या पतंगबाजीत अनेकांच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचा कस लागतो. उत्तरायणाच्या दिवशी रंगीबेरंगी पतंगांनी आकाश झळाळून निघते. गुजरातमध्ये पतंग उडवण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. अनेक जण रस्त्यावर उतरूनही मकरसंक्रांतीचा जल्लोष करतात. उष्णता असह्य होत असल्यानं गुजरातमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून पतंग उडवण्यास सुरुवात होते. या सण भगवान सूर्याला समर्पित असतो. अनेक जण गंगेच्या पवित्र पाण्यात आंघोळही करतात. असं म्हणतात, सूर्य मकरसंक्रांतीच्या दिवशीच पुत्र शनिदेव याची भेट घेऊन दोघांमधील वाद संपुष्टात आणतात. सहा महिन्यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशीच स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात, अशीही आख्यायिका सांगितली जाते. गुजरातमध्ये अनेकांच्या घरात संक्रांतीच्या दिवशी उंधियो हा पदार्थ बनवला जातो. तसेच अनेकांच्या घरात जिलेबीची मेजवाणी असते.