मोबाइल गेम बनवा अन् ५ लाख जिंका, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:58 AM2018-01-06T04:58:40+5:302018-01-06T04:59:08+5:30
वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे.
- महेश चेमटे
मुंबई - वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. आता त्यात ‘स्मार्ट’ भर पडल्याचे दिसून आले आहे. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी मोबाइल गेम बनविण्याचा प्रस्ताव करण्यात येणार आहे. ‘नॅशनल असोसिएशन आॅफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी (नासकॉम)’ यांच्यामार्फत गेम बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजेत्या विकासकाला ५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
रस्ता सुरक्षा जनजागृतीविषयक नासकॉम यांच्यामार्फत मोबाइल गेम बनविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी नासकॉमला करारापोटी व्यवस्थापन शुल्क म्हणून २ लाख रुपये देण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या आयोजनानंतर पहिल्या ३ क्रमांकांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.
यात पहिल्या क्रमांकाला पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला ३ लाख रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. वित्तीय आणि प्रशासकीय विभागाने एकूण १२ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
२०१४ साली २७ हजार ८५२ वरून रस्ते अपघातात २०१६ साली ७३ हजार ७८७ पर्यंत वाढ झाली. जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१७ या काळात ६३ हजार ०१७ नागरिकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला. रस्ता सुरक्षेसाठी मोबाइल गेममधून किती नागरिकांमध्ये जनजागृती होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शुक्रवारी घेतला निर्णय
राज्यातील रस्ते अपघात हा सरकारचा चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे, नुकतेच अपघात रोखण्यासाठी अपघातग्रस्त नागरिकांकडून वाहन नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यामुळे फारसा फरक पडल्याचे दिसून आले नाही. परिणामी, शुक्रवारी रस्ता सुरक्षितताविषयक मोबाइल गेम बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढत्या स्मार्ट फोनधारकांमुळे मोबाइल गेममुळे सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. शिवाय रस्ता सुरक्षा आधारित ‘थीम’ गेममुळे नागरिकांमध्ये जनजागृती होईल, असा विश्वास वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.