मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ९ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
By admin | Published: April 25, 2016 03:12 PM2016-04-25T15:12:33+5:302016-04-25T16:01:31+5:30
मालेगावमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील ९ मुस्लिम आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मालेगावमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील ९ मुस्लिम आरोपींची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील ९ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्याचा निर्णय दिला. या न्यायालयाच्या निर्णयामुळे एटीएस आणि एनआयएला मोठा धक्का बसला असून या प्रकरणातील नऊ आरोपीपैंकी एका आरोपीचा अपघातात मृत्यू झाल्याने उर्वरित आठ आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
या नऊ मुस्लिम आरोपींमध्ये नूरूल हुडा, शब्बीर अहमद, रईस अहमद, सलमान फार्सी, फरोघ मगदुमी, शेख मोहम्मद अली, असीफ खान, मोहम्मद झाहीद आणि अब्रार अहमद यांचा समावेश आहे. या सर्वांना २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. यापैकी दोघांना मुंबईतील २००६ मधील ७/११ बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्याने त्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, आरोपी शब्बीर अहमद याचा गेल्यावर्षी अपघातात मृत्यू झाला होता. मालेगावच्या या बॉम्बस्फोटात ३७ लोकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, ज्या एटीएस आणि एनआयएच्या अधिका-यांनी याप्रकरणाची चौकशी केली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली.