मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली! शरद पवार यांची मिश्कील खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:57 AM2018-02-12T02:57:45+5:302018-02-12T02:57:58+5:30
माझ्या आईवर कोल्हापूरची माती, पाणी आणि माणसांचा संस्कार होता. तेच संस्कार आम्हा भावंडांना तिने दिले. आईवर शाहू महाराज, फुले दाम्पत्य, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता.
कोल्हापूर : मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्कील खंत ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिल्यानंतर व्यक्त केली. व्यग्र कार्यक्रमातूनही त्यांनी येथे आवर्जून भेट देत आठवणींना उजाळा दिला. गावानेही गुढ्या उभारून व दारासमोर रांगोळी, फुलांचा सडा घालून त्यांचे आपुलकीने स्वागत केले.
मामाचे गाव किंवा आजोळ म्हटले की, माणूस हळवा होतो. शरद पवारही त्याला अपवाद कसे ठरतील! त्यांच्या भेटीने या ८०० लोकवस्तीच्या गावामध्ये चैतन्य संचारले. स्वागतासाठी सारा गाव एकवटला. पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांचा जन्म गोलिवडेतील भोसले कुटुंबामध्ये झाला. काही वर्षांनी त्यांचे कुटुंब कोल्हापूरला वास्तव्यास गेले.
‘माझी एक तक्रार आहे, तिचा आता काही उपयोग नाही; पण मामाच्या गावची पोरगी करायची पद्धत आपल्याकडे आहे. मात्र तेव्हा तुम्हीही कुणी काही विचारलं नाही आणि माझ्याही ते लक्षात आलं नाही. आता लग्न होऊन ५० वर्षे झाली. आता बोलून काही उपयोग नाही...’, पवारांच्या या विधानावर जोरदार खसखस पिकली.
माझ्या आईवर कोल्हापूरची माती, पाणी आणि माणसांचा संस्कार होता. तेच संस्कार आम्हा भावंडांना तिने दिले. आईवर शाहू महाराज, फुले दाम्पत्य, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. हीच विचारधारा महाराष्ट्राला शक्ती देईल, यावर तिचा विश्वास होता. आम्ही याच भूमिकेतून काम करीत आहोत. म्हणूनच महिला आरक्षणाचा देशात पहिल्यांदा निर्णय आम्ही घेतला, असे त्यांनी सांगितले. सरपंच नंदा चेचर यांच्या हस्ते पवार यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.