यंदापासून मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार
By Admin | Published: February 22, 2016 01:03 AM2016-02-22T01:03:37+5:302016-02-22T01:03:37+5:30
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ संपन्न होणार आहे.
मुंबई : मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ संपन्न होणार आहे.
या वेळी पहिल्यांदाच मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार आणि डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, अन्य पुरस्कारही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.
या वेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ८ ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. त्यात ‘मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास’, राणा चव्हाण यांच्या लेखांचा संग्रह, खाद्यसंस्कृती कोश, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मपर वाङ्मय दुसरा खंड (एकूण चार पुस्तके) आणि संत साहित्याचे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ शं.वा. तथा मामासाहेब दांडेकर यांच्यावर आधारित ग्रंथ यांचा समावेश आहे.
या सोहळ्यात श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार २०१५, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार २०१५ आणि उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१४ वितरण सोहळाही पार पडणार आहे. याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार (२०१५) प्राप्त साहित्यिकांनाही गौरविण्यात येणार आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक
कार्यमंत्री विनोद तावडे आणि
मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मराठी
भाषेची स्थित्यंतरे उलगडणारा ‘मराठीनामा’ हा कलाकारांचा दृकश्राव्य कार्यक्रम सादर होणार
आहे. (प्रतिनिधी)