मोघम आरोपांवरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:50 AM2017-07-31T02:50:21+5:302017-07-31T02:54:34+5:30
मोघम आरोपांवरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. त्यासाठी विशिष्ट घटनांसह बाजू मांडणे आवश्यक आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
नागपूर : मोघम आरोपांवरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. त्यासाठी विशिष्ट घटनांसह बाजू मांडणे आवश्यक आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
एका तरुणाचे २००६ मध्ये लग्न झाले. त्यानंतर त्याने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागितला होता. पत्नी स्वयंपाक करीत नाही. त्यामुळे हॉटेलमधून भोजन मागवावे लागते. पत्नी सासरच्या कुटुंबीयांना टाळते. ती वारंवार माहेरी व मित्रांच्या घरी जाते. विविध प्रकारच्या धमक्या देते असे पतीचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने पतीच्या आरोपांत काहीच तथ्य नसल्याचे सांगितले.
सामान्य आरोपांवरून क्रूरता सिद्ध होत नाही. त्यामुळे घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. आरोप सिद्ध करण्यासाठी विशिष्ट घटनांची उदाहरणे देणे आवश्यक आहे.
पतीने घटस्फोटासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळली गेल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती अरुण उपाध्ये यांनी वरीलप्रमाणे मुद्दे स्पष्ट करून पतीचे अपील फेटाळून लावले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.