Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे सत्र सुरूच; मराठवाड्यातील धग कायम, पुण्यातही कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 01:31 AM2018-08-04T01:31:22+5:302018-08-04T01:31:45+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

Maratha Reservation: Session of Maratha Movement Begins; Strike in Marathwada, activists attacked in Pune | Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे सत्र सुरूच; मराठवाड्यातील धग कायम, पुण्यातही कार्यकर्ते आक्रमक

Maratha Reservation: मराठा आंदोलनाचे सत्र सुरूच; मराठवाड्यातील धग कायम, पुण्यातही कार्यकर्ते आक्रमक

googlenewsNext

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या आंदोलनाची मालिका मराठवाड्यात कायम आहे. शुक्रवारी लातूर, हिंगोलीत आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. विदर्भात काही ठिकाणी घंटानाद करीत झोपमोड आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीत कडकडीत बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, बारामती शहरातून शनिवारपासून सामाजिक एकोप्यासाठी मराठा संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे.
मराठवाड्यात परळीतील आंदोलन सुरू असून आ. सतीश चव्हाण यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. बीड जिल्ह्यातही पडसाद उमटले. केज येथे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, तर भाटुंबा येथे रास्ता रोको करण्यात आला. गेवराईत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. अंबाजोगाई येथे जागरण गोंधळ करत उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.
परभणी जिल्ह्यात आंदोलन सुरूच असून, सोनपेठ शहरातील शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. काही बसेसवर दगडफेक झाली. मानवत येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी १०१ नारळ फोडून आरक्षणाचा नवस केला. सोमठाणा ग्रुप ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला.
खा. राजीव सातव यांच्या कळमनुरीतील (जि. हिंगोली) घरासमोर भजन आंदोलन केले. हिंगोलीतील गांधी चौकात पाच दिवसांपासून आंदोलन सुरू असून आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसमोर मुंडण करून शासनाचा निषेध केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील आमठाणा (ता. सिल्लोड) येथे कार्यकर्त्यांनी मुंडण आंदोलन केले. पैठण शहरातील महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ठिय्या आंदोलन केले.
पुण्यातही कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठा क्रांती मोर्चाबद्दल कथित वादग्रस्त विधान केल्याने आंदोलकांनी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही कार्यकर्त्यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला. आंदोलकांचे निवेदन पोलिसांनी स्वीकारले आणि त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले. कोपरगाव येथे सकल मुस्लीम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सामुदायिकरित्या मुंडण आंदोलन करून आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. तर मराठा-मुस्लीम-धनगर समाजाने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत अभूतपूर्व एकीचे दर्शन घडवित नेवासा तहसीलवर संयुक्त मोर्चाने जाऊन धडक मारली. राशीन ते कर्जत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
विदर्भातही आंदोलन जोर धरत आहे. चांदूर रेल्वे येथे आ. वीरेंद्र जगताप यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शनिवारी चांदूर रेल्वे बंदची हाक देण्यात आली आहे.

कोल्हापुरात सरकार घराणीही रस्त्यावर
मराठा आरक्षणासाठी प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध घराण्यांच्या वंशंजातील कुटुंबांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ‘ताराराणी चौक ते दसरा चौक’ अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत गायकवाड, पाटणकर, खानविलकर, निंबाळकर, महागावकर, जाधव, माने, घाटगे, मोहिते, घोरपडे, चव्हाण, शिंदे आदी घराण्यांतील ३०० हून अधिक सदस्यांचा समावेश होता. महिलाही अग्रभागी होत्या.
सत्येंद्रसिंह मोहिते हे आपल्या घराण्याची परंपरागत तलवार घेऊन या मोटारसायकल रॅलीत सहभागी झाले होते; तर पैलवान कुणालाही उगीच शड्डू मारत नाही. त्यामुळे आमच्यावर सरकारने शड्डू मारण्याची वेळ आणू नये, असा इशाराही रविराज निंबाळकर यांनी दिला.

रत्नागिरीत बंद आंदोलन शांततेत : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रत्नागिरीसह लांजा, राजापूर येथे बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. हातखंबा येथे मुंबई-गोवा महामार्ग अडवण्यात आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जिल्हा बंद आंदोलनात आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, माजी खासदार नीलेश राणे आदी सहभागी झाले होते. चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, मंडणगड आणि खेड तालुके या मोर्चात सहभागी झालेले नाहीत.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीने काम करीत आहे. कारण या मुद्द्यावर राजकारण करण्याचा भाजपाचा अजिबात इरादा नाही, असे भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी स्पष्ट केले. वायदे करण्याऐवजी प्रत्यक्षात काम करणारे हे महाराष्टÑातील पहिले सरकार आहे.

Web Title: Maratha Reservation: Session of Maratha Movement Begins; Strike in Marathwada, activists attacked in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.