मराठी चित्रपट महामंडळ की आखाडा

By Admin | Published: January 8, 2016 12:37 AM2016-01-08T00:37:11+5:302016-01-08T01:14:22+5:30

कोल्हापूरकरांचा सवाल : शिष्टाई एका गटाशी, वाद उकरला अन्य गटाने; वार्षिक सभेत वादावादी

Marathi Film Corporation's Aakhada | मराठी चित्रपट महामंडळ की आखाडा

मराठी चित्रपट महामंडळ की आखाडा

googlenewsNext

कोल्हापूर : कला, सांस्कृ तिक ओळख असणाऱ्या कोल्हापुरात आता शिक्षकांच्या वार्षिक सभेसारखी गुद्दागुद्दी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या द्विवार्षिक सभेत अनुभवायला आली. या प्रकाराने कोल्हापूरवासीयांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटात सुरेख अभिनय करून चांगली भूमिका बजावणारे कलाकार प्रत्यक्षात मात्र रस्त्यावरच्या सराइताप्रमाणे व्यवहार करतात, असा सूर उमटत आहे.
विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाल १२ डिसेंबरला संपला असून, यातील पदाधिकाऱ्यांना महामंडळाच्या घटनेप्रमाणे कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. ६ जानेवारी २०१६ ची सर्वसाधारण सभाच बेकायदेशीर आहे. याचबरोबर विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याकडे तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सात लाख ३४ हजार ३६३ रुपयांची रक्कम दिली असताना ती अष्टेकर यांनी कार्यालयाकडे का भरली नाही? यासह अन्य आरोप करीत काही मंडळींनी सभेपूर्वीच मोठा गाजावाजा केला. मात्र, सभेच्या आदल्या रात्री विद्यमान कार्यकारिणी व आरोप करणारी मंडळी यांच्यात एका हॉटेलमध्ये काही नेतेमंडळींनी मराठी चित्रपट महामंडळाची बदनामी होते, म्हणून सभा शांततेत पार पाडावी. अशी अपेक्षा व्यक्त करून शिष्टाई केली. त्याप्रमाणे ही मंडळीही काही प्रमाणात गप्प झाली. मात्र, कोल्हापुरातील अन्य सभासदांनी १३ लाख आणि ७ लाख ३४ हजारांचा हिशेब माजी अध्यक्षांनी सभास्थानी द्यावा, म्हणून जोरदार मागणी केली. यावर विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी हा खर्चच महामंडळाच्या कार्यक्रमासाठी केला आहे. त्यांनी ते पैसे खिशात घातलेले नाहीत असे स्पष्ट केले. यावर मुंबईतील सभासदांनी अध्यक्षांची बाजू घेतली आणि वादाला तोंड फुटले. प्रथम यात एक सामाजिक कार्यकर्ते आणि एक अभिनेता हा वाद मिटवण्यासाठी गेले. मात्र, मुंबईकरांना वाटले आपल्याला हे कार्यकर्ते मारहाण करण्यास आले आहेत. त्यातून वादावादीला तोंड फुटले. या गोंधळानंतर अध्यक्षांनीही सभेतील ८ पैकी ७ विषय स्वत: मंजूर, मंजूर म्हणत ते मंजूर झाल्याची व सभा संपल्याची घोषणाही केली. या सर्व प्रकाराने एका शिक्षक संघटनेच्या पतसंस्थेच्या सभेची नव्हे, गुद्दागुद्दीची आठवण पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना करून दिली.


शिष्टाई एकाशी वाद दुसऱ्याचा
मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी कोल्हापुरातील तालमींशी व आंदोलनाशी संबंधित असलेल्या नेत्यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांबरोबर चर्चा करून हा वाद मिटवला होता. मात्र, तरीही सभेत व्हायचे तेच झाले. कारण या नेतेमंडळींनी शिष्टाई एका गटाशी केली होती. त्यामुळे हा गट काही प्रमाणात गप्प बसला. मात्र, सर्वसामान्य असणारा सभासद महामंडळाचे नुकसान होते म्हणून उठून बसला. या गोंधळात सभेचा नूर मुंबईकर विरुद्ध कोल्हापूरकर असा झाला, हे कोणालाच कळाले नाही.


शुक्रवारी सकाळी आम्ही सर्व सभासद मंडळी प्रथम महामंडळाच्या कार्यालयात जाऊ. तेथे प्रोसिडिंग लिहिले आहे की नाही हे पाहू. त्यानंतर सर्व सभासदांची सही असलेले निवेदन धर्मादाय आयुक्तांना देऊन त्यांच्याकडे महामंडळावर प्रशासक नेमण्याची मागणी करू.
- रणजित जाधव,
सभासद

Web Title: Marathi Film Corporation's Aakhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.