मराठी हायकूच्या जन्मदात्री ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै कालवश ! वाचा कोण होत्या त्या?
By संदीप आडनाईक | Published: September 2, 2017 05:00 PM2017-09-02T17:00:14+5:302017-09-02T17:07:41+5:30
हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणार्या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला.
हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणा-या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. शिरीष पै यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या पप्पांमुळे म्हणजे आचार्य अत्रे यांच्यामुळे झाली. त्यांच्याच लेखणीचा वारसा त्यांनी घेतला. त्यांच्या सहवासातच त्यांना लिखाणाची गोडी लागली. कथा, कविता, नाटक आणि प्रासंगिक लेखन असे चौफेर लिखाण त्यांनी केले.
आचार्य अत्रे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभागी झाले होते,तेव्हा त्यांना तुरुंगात टाकले होते. त्या काळात दै. मराठा या वृत्तपत्राची जबाबदारी शिरीषजींवरच होती. त्यावेळी या दैनिकात काम करणा-या सहका-यांच्या मदतीने त्यांनी वडिलांच्या गैरहजेरीत काही अग्रलेख दै मराठामध्ये लिहिले आणि ते छापून आले. जेव्हा त्या अत्रे यांना तुरुंगात भेटायला जायचे तेव्हा ते त्यांच्या अग्रलेखांचे कौतुक करत. याच काळात शिरीषजींचा परिचय विजय तेंडुलकर, केशव मेश्राम, नारायण सुर्वे यांच्याशी झाला आणि त्यामुळे त्यांचे लिखाण अधिकाधिक चांगले झाले, असे खुद्द शिरीषताईंनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे.
`चैत्रपालखी’, `सुखस्वप्न’, `मयूरपंख’, `हापूसचे आंबे’, `मंगळसूत्र’, `खडकचाफा’, `कांचनबहार’, `हृदयरंग’ अशा काही कथासंग्रहातून त्यांनी प्रामुख्याने स्त्री दुःखाचाच शोध घेण्याचा प्रयत्न केला. `एकतारी’, `गायवाट’, `कस्तुरी’, `ऋतूचित्र’ मधील थंडीच्या कविता, `एका पावसाळ्यात’ या कविता संग्रहात आत्मकेंद्रित मनाचे ठाम वर्णन आणि प्रेमानुभवाचे चित्रण केले.
त्यांना `हायकु’मुळे खरे तर जास्त लोकप्रियता लाभली. `हायकू’ म्हणजे जपानी काव्यप्रकार. त्याला मराठीचे रूप शिरीषताईंनी दिले. तीन ओळींच्या कवितेतून सारा आशय मांडण्याचा प्रयत्न म्हणजे हायकू. `लालन बैरागीण’, `हेही दिवस जातील’ या त्यांच्या कादंब-या गाजल्या. छोट्या मुलांसाठीही त्यांनी `आईची गाणी’, `बागेतल्या जमती’ या बाल साहित्याची निर्मिती केली. लहान मुलांसाठी त्यांनी कथासंग्रह, ललित लेखन केले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्यासाठी नाटंकही लिहिली. `हा खेळ सावल्यांचा’, `झपाटलेली’, `कळी एकदा फुलली होती’ ही नाटकं लिहिली. `आजचा दिवस’, `आतला आवाज’, `प्रियजन’, `अनुभवांती’, `सच’, `मी माझे मला’ या ललित लेखनाने एक लेखिका म्हणून त्यांचे नाव झाले.
आचार्य अत्रे यांची मुलगी म्हणून लोकं ओळखतात, तेव्हा खूप बरे वाटते. कारण मला असे वाटते की, माझ्या पप्पांसारखे अफाट कर्तृत्व आणि दूरदृष्टी कोणाचीच नव्हती आणि त्यामुळेच `पप्पा’ आणि `वडिलांचे सेवेशी’ या पुस्तकातून आचार्य अत्रे कसे होते हे मांडण्याचा प्रयत्न केला असे शिरीषताईं आपल्या मुलाखतीमधून आवर्जून सांगतात.
पत्रकार, कादंबरीकार, कवयित्री, ललित लेखिका अशी अनेक रुपे असलेल्या शिरीष पै आज आपल्यात नाहीत. पत्रकारिता करताना आजुबाजूला नेमके काय घडतंय याची जाण असणे महत्त्वाचे तर इतर लेखन करताना तुम्ही समाजासाठी लिहित आहात हे लक्षात ठेवून तुमचे लिखाण समाजाला आवडणे अतिशय गरजेचे आहे अशी त्यांची भूमिका. `हायकू’ हा प्रयोग कवितेत करणा-या शिरीषताई यांचा आदर्श विंदा करंदीकर होते. विंदाचा `मृद्गंध’ हा काव्यसंग्रह वाचला आणि तेव्हापासून कवितेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी त्यांना लाभली. त्यांच्या कवितांनी मला घडविले, असे त्या सांगत. `हायकू’ हा अल्पाक्षरी जपानी काव्यप्रकार कमीतकमी तीन ओळीत जीवनार्थ सांगतो. हा काव्यप्रकार मराठीत चारोळ्याच्या जवळ जाणारा. या `हायकू’ला जे स्थान जपानीत मिळालं ते मराठीतही मिळालं, ते फक्त शिरीष पैंमुळेच. मराठीत `हायकू’ लोकप्रिय करण्याचं सारं श्रेय शिरीष पै यांनाच. त्यांनीच हा काव्यप्रकार मराठीत प्रथम आणला आणि रुजवला.