संमेलनाध्यक्ष निवडणार सर्वसंमतीनेच, यंदापासूनच सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 07:00 AM2018-09-26T07:00:20+5:302018-09-26T07:00:32+5:30
यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने नाही, तर सर्वसहमतीने निवडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे जाहीर केले.
नागपूर - यवतमाळ येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने नाही, तर सर्वसहमतीने निवडणार असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे जाहीर केले.
यापुढे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही, असे महामंडळाने यापूर्वीच जाहीर केले होते. तथापि, हा निर्णय पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनापासून लागू होणार होता. मात्र, घटनादुरुस्तीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्याने यंदापासून अध्यक्षपदाची निवडणूक रद्द करीत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. त्यामुळे यवतमाळच्या अध्यक्षपदासाठी १ आॅक्टोबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रियाही रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता अध्यक्षपदाची निवड घटक संस्थांनी सुचविलेल्या नावातून होणार आहे. त्यानुसार महामंडळाच्या चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, समाविष्ट संस्थांकडून पाच, संलग्न संस्थांकडून प्रत्येकी एक नाव, संमेलन निमंत्रक संस्थेकडून एक तर विद्यमान संमेलन अध्यक्ष एक नाव, अशी २० नावे सुचविण्यात येणार आहेत. येत्या २८ आॅक्टोबर रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या महामंडळाच्या सभेपर्यंत ही नावे मागविण्यात आली आहेत.
बाहेरील संस्थांसाठी दरवाजे खुले
बाहेरील साहित्य संस्थांसाठी महामंडळाने आपले दरवाजे खुले केले आहेत. २५ वर्षापासून नोंदणीकृत आणि कार्यरत असलेल्या साहित्य संस्थांना ‘सहयोगी संस्था’ म्हणून महामंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळासोबत सध्या चार घटक संस्था, पाच समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था आहे.
स्वतंत्र वार्षिक अधिवेशन
सर्व संस्थांचे एक स्वतंत्र वार्षिक अधिवेशन भरविण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. केवळ साहित्यविषयक गोष्टींचा उहापोह होत होता. त्यामुळे या साहित्य संमेलनात चर्चेला न येणारे महत्त्वाचे व गंभीर विषय तसेच संस्थात्मक विश्वाचे महत्त्वाचे प्रश्न, समस्या, अडचणी आदींवर चर्चा आणि उपाययोजनांवर भर दिला जावा यासाठी वार्षिक अधिवेशन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.