राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मध्यरात्रीपासून संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 01:50 AM2018-06-13T01:50:04+5:302018-06-13T01:54:01+5:30
राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी हे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
मुंबई - राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी हे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना 11 हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या 2015 साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे.
Medical interns from all over #Maharashtra have started an indefinite strike, demanding a hike in their stipend from the state government. The medical interns in Maharashtra are being paid a stipend of Rs 6000 per month
— ANI (@ANI) June 12, 2018
असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्सने १३ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून हे डॉक्टर संपावर गेले आहेत. जुलै २०१५ साली इंटर्न्स डॉक्टरांना ११ हजार वेतनमान मिळावे हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, दरवर्षी पाठपुरावा करूनही यात वाढ करण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर, २६ एप्रिल २०१८ रोजी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील इंटर्न्स डॉक्टरांनी मूकमोर्चा आणि निषेध प्रदर्शने केली होती. त्यानंतर, २ मे रोजी वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि अर्थ विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत तातडीने इंटर्न्सना वेतनवाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले, पण अद्यापही त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. सध्या राज्यभरात २ हजार ३०० इंटर्न्स डॉक्टर्स आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हे डॉक्टर्स संपावर गेल्याने त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होण्याची आणि याचा फटका सामान्यांना बसण्याची शक्यता आहे.