आनंददायी अभ्यंगस्नान

By admin | Published: November 7, 2015 01:24 AM2015-11-07T01:24:39+5:302015-11-07T01:24:39+5:30

पहाटे सूर्य उगवायच्या आत उटणे, सुगंधी तेल लावून गरम गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले की खऱ्या अर्थाने दिवसाची सुरू झाल्याचा आनंद मिळतो. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी

Merry hype | आनंददायी अभ्यंगस्नान

आनंददायी अभ्यंगस्नान

Next

पहाटे सूर्य उगवायच्या आत उटणे, सुगंधी तेल लावून गरम गरम पाण्याने अभ्यंगस्नान केले की खऱ्या अर्थाने दिवसाची सुरू झाल्याचा आनंद मिळतो. धनत्रयोदशीपासूनच दिवाळी सुरू होत असली तरी अभ्यंगस्नान, फटाके फोडण्यास सुरुवात होते ती नरक चतुर्दशीपासून. श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा हिने या दिवशी नरकासुराचा वध केला, अशी एक पुराणकथा आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी जो अंघोळ करणार नाही तो नरकात जाईल, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची, पायाच्या अंगठ्याने कारेटे फोडून दिवे लावून विजयोत्सव साजरा केला जातो. या अनोख्या प्रथेविषयी...

पूर्वी घराघरातील महिला या पहिल्या अंघोळीची सर्व तयारी करीत. शिकेकाई, रिठा, कडुनिंब यासारख्या औषधी वनस्पती तांब्याच्या भांड्यातील पाण्यात घालून ते पाणी उकळून घेत. हे पाणी केस धुण्यासाठी वापरले जात असे. अंघोळीपूर्वी महिला घरातील पुरुषांना आणि मुलांना तेलाने मालीश करीत. हे तेल प्रामुख्याने जाईच्या सुवासिक फुलांचे असे. हे फुल सात्विक मानले जाते. राधाकृष्णासाठी जाईजुईच्या फुलांची, तुळशीची आरास करायची असा उल्लेख लोककथा आणि गीतांमध्ये आहे. सुवासिक तेलाचे मालीश झाले की बेसन, हळद, चंदन, गुलाबपाणी यापासून तयार केलेले सुगंधी उटणे अंगाला लावले जाते. आजच्या काळात ज्याला स्क्रब म्हटले जाते असे हे नैसर्गिक स्क्रब असलेले उटणे लावल्याने जुनी त्वचा निघून जाते आणि त्वचा टवटवीत व कोमल होते. काही घरांत उटण्यामध्ये कापूर, साय, संत्र्याची सालही वापरली जाते.
उटण्याचे अंग घासून झाले की जाईच्या साबणाने अंघोळ केली जाते. अंघोळीच्या शेवटी प्रार्थना करण्याची व अर्ध्य देण्याची पद्धत आहे. अंघोळीनंतर पारंपरिक पोशाख केला जातो. रांगोळी काढली जाते. दारे-खिडक्यांमध्ये पणत्या लावतात. सर्वजण मिळून फराळाचा आस्वाद घेतात.
मात्र बदलती जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती यामुळे सण साजरा करण्याची पद्धतही बदलली आहे. पहाटे उठून तेलमालीश, उटणे लावून अंघोळ करणे हे अनेकांना वेळखाऊ वाटते. त्यामुळे पहिली अंघोळ अगदी झटपट उरकली जाते. मात्र अभ्यंगस्नान बदलत्या जीवनशैलीतील अधिक उपयुक्त आहे. अभ्यंगस्नानामुळे आपण परंपरा जपतोच, शिवाय त्यामुळे नवी उमेद मिळते. जाईच्या सुवासिक तेलाने मालीश केल्याने शरीर टवटवीत होते, ताणतणाव नाहीसे होतात. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीत न करता दर आठवड्याला करावे, असा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्रथा जुन्या व नव्या पिढीतील अंतर दूर करते आणि नाते अधिक दृढ करते.

Web Title: Merry hype

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.