चमत्कार! समुद्रात बुडून बेपत्ता झालेला तरुण नवव्या दिवशी जिवंत परतला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 07:23 PM2018-04-30T19:23:03+5:302018-04-30T19:28:49+5:30
रविवारी 22 एप्रिल रोजी समुद्रात बुडून बेपत्ता झालेला एक तरुण नऊ दिवसानंतर सुखरूपपणे परतला आहे.
- अमूलकुमार जैन
रायगड - मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात गेल्या रविवारी 22 एप्रिल रोजी बुडालेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावांतील 25 वर्षीय अमोल दिलीप पाटील हा तब्बल नवव्या दिवशी सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचला असल्याची माहिती मुरुड पोलिसांना प्राप्त झाली आहे. मात्र गेल्या रविवारी 22 एप्रिल रोजी नेमके काय झाले याचा तपास आता सुरु करण्यात आला असल्याची माहिती मुरुड पोलीस निरिक्षक किशोर साळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
अमोल दिलीप पाटील व त्याचा अहमदनगर जिल्ह्यातील सुगंधा येथील 26 वर्षीय मित्न सतिश ढोके हे दोघेही त्यांच्या पुढील शिक्षणीक प्रवेश प्रकियेसाठी पुणे येथे आले होते. प्रवेश प्रकिया झाल्यानंतर २२ एप्रिल २०१८ रोजी मुरूड तालुक्यातील मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्र किनारी फिरण्यासाठी सकाळी साडे अकराच्या सुमारास ते एका मोटरसायकल वरु न आले होते. दुपारी दोन अडीच्या सुमारास काशिद समुद्रात ते पोहण्याकरीता उतरले. मात्न स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना पाण्यात उतरण्यास मनाई केली असता त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, आणि पाण्यात उतरले.
यावेळी अमोल पाटील याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो लाटेच्या पाण्यात दिसेनासा झाला. तेव्हा पासून भारतीय तटरक्षक दल, मुरुड पोलीस आणि स्थानिक जिवरक्षक ग्रामस्थांनी रविवार पासून त्याचा रायगड जिल्ह्यातील प्रत्येक समुद्रकिनारी शोध घेत होते. अमोल पाटील काशिद समुद्रात बुडाल्या बाबत रायगडच्या किनारी भागातील सर्व पोलीस ठाणी व गावात सूचना देवून त्यांच्या माध्यमातूनही शोध मोहिम कार्यान्वित करण्यात आली होती.
मात्न सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अमोल पाटील हा सुखरूपपणे त्याच्या घरी परतला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी मुरूड पोलीस स्टेशनला संपर्क साधून सांगितले. अमोल पाटील हा त्याच्या घरी पोहचला असून तो मानिसक तणावाखाली आहे.त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेऊन उपचार करण्यास सांगितले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांनी सांगितले.
अमोल हा सुखरूप पणे घरी आला आहे.मात्न त्याची मानसिक स्थिती ही नाजूक आहे. घरी येताना तो जोरजोरात ओरडत आणि रडत घरी आला. सध्या त्याला घरात त्याला एका खोलीत ठेवले असून डॉक्टरांना उपचारासाठी घरी बोलविण्यात आले आहे.
-विद्याधर पाटील (अमोल पाटील यांचा चुलत भाऊ)
अमोल सुखरुप घरी पोहोचला हे चांगले आहे. परंतू गेले नऊ दिवस तो कोठे होता. गेल्या २२ एप्रिल रोजी तो काशिदच्या समुद्रात बुडाल्यावर तत्काळ शोध मोहिम सुरु करुनही तो सापडला नाही. त्याचे नातेवाईक देखील येथे येवून शोध घेत होते. या सर्व पाश्र्वभूमीवर त्याचा मित्र सतिश ढोके यास मुरुड पोलीस ठाण्यात उद्या बोलावले आहे. नेमके काय घडले यांचा तपास पूर्ण करणार आहे.
- किशोर साळे, मुरुड पोलीस निरिक्षक