कॅन्सर रुग्णाचे पैसे परत न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला मनसेकडून चोप; मारहाणीचं फेसबुक लाईव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 01:06 PM2019-02-13T13:06:23+5:302019-02-13T13:07:47+5:30
ठाण्याचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची व्यावसायिकाला मारहाण
विरार: कर्करोग पीडित व्यक्तीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या हॉटेल मालकाला मनसेनं चोप दिला आहे. राजू शेट्टी असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो हॉटेल मालक आहे. विशेष म्हणजे मनसेनं या मारहाणीचं फेसबुक लाईव्ह केलं. यामध्ये ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव हे शेट्टी यांना मारहाण करताना दिसत आहेत.
विरारमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं राजू शेट्टी यांची तक्रार मनसेकडे केली होती. शेट्टींनी आपल्याकडून 16 लाख रुपये घेतले. मात्र आता ते रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याचं पीडित व्यक्तीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर काल मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शेट्टी यांना गाठलं आणि त्यांनी झाल्या प्रकाराबद्दल शेट्टी यांना जाब विचारला. यानंतर जाधव यांनी शेट्टी यांना बेदम मारहाण केली. मनसेनं या घटनेचं फेसबुक लाईव्हदेखील केलं.
संबंधित पीडित व्यक्तीला कर्करोग आहे. तिला उपचारांसाठी उपचारांसाठी दररोज 5 हजार रुपये लागतात. आसपासची माणसं त्या व्यक्तीला मदत करतात. राजू शेट्टी यांच्याकडे पीडित व्यक्तीचे 16 लाख रुपये असूनही ते त्यांना परत करायला तयार नाहीत. त्यामुळेच शेट्टी यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवण्यात आला, असं अविनाश जाधव यांनी सांगितलं. समोरचा माणूस मेल्यावर तुम्ही पैसे परत करणार का, असा प्रश्न शेट्टी यांना आम्हाला विचारला, असंदेखील जाधव म्हणाले.
याआधी 31 जानेवारीला मनसेच्या नितीन नांदगावकरांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलात एका रिक्षा चालकाला चोप दिला होता. त्या रिक्षा चालकानं एका मराठी तरुणाशी किरकोळ कारणावरून वाद घालून त्याला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी त्या रिक्षा चालकाला शोधून काढण्यासाठी मोहीम हाती घेतली. हा रिक्षा चालक मनसेच्या कार्यकर्त्यांना बीकेसीमध्ये सापडला. त्यानंतर नांदगावकर यांनी त्याला समज देत चोप दिला.