उन्हाळी सुट्टीनिमित्त एसटीच्या जादा बस,निवडणुकीसाठी ५०० बस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:37 PM2019-04-10T18:37:10+5:302019-04-10T18:41:04+5:30
पुण्यामध्ये नोकरी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. तसेच मराठवाड्यातून आलेले अनेक जण स्थानिक झाले आहे.
पुणे : शाळा, महाविद्यालयांना सुट्या सुरू होत असल्याने बाहेगावी जाणाऱ्यांची एसटी बसला मोठी गर्दी होते. यापार्श्वभुमीवर महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. पुणे विभागातील विविध आगारातून यावर्षी सुमारे १५० जादा बस सोडण्यात येणार आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात जाण्यासाठी प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून दरवर्षी जादा बस सोडण्यात येतात. बहुतेक शाळा व महाविद्यालयांना सुट्या सुरू झाल्या आहेत. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या असून सुट्यांमधील नियोजन सुरू झाले आहे. पुण्यामध्ये नोकरी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे. तसेच लगतच्या परिसरातही मराठवाड्यातून आलेले अनेक जण स्थानिक झाले आहे. बाहेरगावी जाण्यासाठी त्यांच्याकडून एसटीचा वापर केला जातो. त्याअनुषंगाने पुणे विभागाने नियमित बसव्यतिरिक्त सुमारे १५० जादा बसचे नियोजन केले आहे. पुण्यातून स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकासह पिंपरी चिंचवड, सासवड, बारामती, इंदापुर, सासवड, दौंड, शिरूर, भोर अशा एकुण १३ स्थानकांतून या बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार पुढील आठवड्यापासून बस सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
-----------------
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यात निवडणुक होत आहे. दि. २३ व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून ५०० हून अधिक बस दिल्या जाणार आहेत. या बस दि. २२ व २८ एप्रिल रोजी दुपारपर्यंत व दि. २३ व २९ एप्रिल रोजी दुपारनंतर निवडणुक कामासाठी जिल्या जाणार आहेत. त्यामुळे निवडणुक कर्मचारी, अधिकारी, ईव्हीएम मशिन व इतर साहित्याची ने-आण केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात एसटीकडे सध्या सुमारे १ हजार २५ बस आहेत. त्यातील निम्म्या बस निवडणुक कामासाठी द्याव्या लागणार असल्याने दि. २२ व दि. २८ एप्रिलला दुपारपर्यंत आणि दि. २३ व २९ एप्रिल रोजी दुपारनंतरची एसटी वाहतुकीचे नियोजन कोलमडणार आहे.
....................
बस स्थानकनिहाय जादा गाड्या
शिवाजीनगर - जालना, बीड, धुळे, लातूर, मालेगाव, अकोला
स्वारगेट - तुळजापुर, बिदर, विजापुर, गुलबर्गा, गाणगापुर, पंढरपुर, दापोली
पिंपरी चिंचवड - लातुर, बीड, कोल्हापूर, सोलापूर, दापोली
सासवड - पंढरपुर, सातारा, नाशिक, औरंगाबाद
भोर - औरंगाबाद, नाशिक, पंढरपुर, महाड, कोल्हापूर
नारायणगाव - संगमनेर, नाशिक, शिर्डी, बार्शी, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वर.
राजगुरूनगर - पैठण, धुळे, बार्शी, बीड.
तळेगाव - शिर्डी, नाशिक, औरंगाबाद, तुळजापुर
शिरूर - औरंगाबाद, तुळजापुर, जालना, बीड
बारामती - औरंगाबाद, बीड, शिर्डी, सोलापुर, पंढरपुर, सातारा, दादर
एमआयडीसी - लातूर, बीड
इंदापूर - धारूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, पुणे, तुळजापुर, इचलकरंजी, परळी
दौंड - जळगाव, कोल्हापुर, औरंगाबाद