राज्यात कोल्हापूरमध्ये डेंग्यूचे रुग्ण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:16 PM2019-10-16T12:16:42+5:302019-10-16T12:21:50+5:30
पुरामुळे वाढली तीव्रता : पुणे अन् ठाण्यात फैलाव जास्त
पुणे : राज्यात डेंग्यूचे थैमान सुरूच असून दिवसागणिक या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यातल्या आठ प्रमुख विभागांपैकी कोल्हापूरमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक असून त्यानंतर पुणे आणि ठाणेचा क्रमांक आहे.
राज्यात गेल्या वर्षीपासूनच डेंग्यू ठाण मांडून बसला आहे. यंदाच्या वर्षी पावसाच्या रौद्ररूपाने त्यात अधिकच भर पडली. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरला पुराचा फटका बसला. पुरामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागात १६३० इतकी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झाली असून, त्याखालोखाल पुण्यात १४६२ आणि ठाणे विभागामध्ये १३०३ इतकी रुग्णसंख्या आहे.
सप्टेंबरअखेरपर्यंत ६३९० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डॉ. आवटे म्हणाले, की गेल्या वर्षीदेखील राज्यात कोल्हापूर विभागात डेंग्यूचा उद्रेक होता. ही संख्या १७०१ एवढी होती. यावर्षीही ही संख्या तेवढीच आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरमधील काही भागांना पुराचा फटका बसल्यामुळे डेंग्यूचा फैलाव झाला आहे. खाचखळग्यांमध्ये पाणी साचण्यामुळे तिथेच डासांची पैदास होते. डेंग्यूचा डास हा घरात व आसपासच्या भागात साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यातही होतो. त्यामुळे पाऊस अनियमित झाला आणि दुष्काळ जरी पडला तरी पाणी साठवून ठेवण्यामुळे डेंग्यूच्या डासांची पैदास होते.
शहरी भागात डेंग्यू आहेच, पण ग्रामीण भागाचेही शहरीकरण झाल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढते आहे. यासाठी आरोग्य विभागातर्फे दोन प्रकारची सर्वेक्षणे केली जातात. त्यातील एक ताप रुग्ण आहे. घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण आहेत का? याची पाहणी केली जाते.
दुसरे महत्त्वाचे सर्वेक्षण आहे ते म्हणजे घराघरात जाऊन पाणी साठवण्याची भांडी पाहिली जातात, की कुठे डेंग्यूच्या डासाच्या अळ्या आहेत का? याशिवाय डासांची उत्पत्तीक्षेत्रे आहेत त्याचेही सर्वेक्षण करून यादी तयार केली जाते. छोटे तलाव, पावसामुळे खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी याची पाहणी करून त्यात रसायन टाकणे, गप्पी मासे सोडणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांचे कार्यस्थळ याच्यावरही लक्ष ठेवले जाते. कुणाच्या मालकीच्या घरात डासांची उत्पत्ती झालेली दिसली तर त्यांना नोटिसा पाठवणे व दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. आरोग्य विभाग डेंग्यूंचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पण नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.
.........
सर्व पातळ्यांवर प्रशासनाचे प्रयत्न सुरू.
च्पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डेंग्यूंचे ४०८ रुग्ण, महापालिका हद्दीत ५८० आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२१ रुग्ण आढळले आहेत. सोसायट्यांसह घरोघरी जाऊन नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. सर्व पातळ्यांवर प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.