धूरक्याने अडविली वाट, धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने मुंबईकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 04:49 AM2017-12-10T04:49:01+5:302017-12-10T04:49:20+5:30
मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे शहरातील गारठ्यात वाढ झाली असतानाच, दुसरीकडे शनिवारी सकाळी धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे वातावरणात तयार झालेल्या धूरक्याचा मुंबईच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे शहरातील गारठ्यात वाढ झाली असतानाच, दुसरीकडे शनिवारी सकाळी धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे वातावरणात तयार झालेल्या धूरक्याचा मुंबईच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला. विशेषत: सकाळपासून मुंबईच्या वातावरणात पसरलेले धूरके सायंकाळपर्यंत कायम राहिले होते. या धूरक्याचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला. शनिवारी सकाळी रस्ते व रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर, मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत असून, किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसाने यात भर घातल्याने तापमान खाली घसरले आहे. याचा परिणाम म्हणून गारठ्यात वाढ झाली आहे.
पहाटे पसरलेल्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. याचा परिणाम म्हणून सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. रस्ते वाहतुकीलाही याचा फटका बसला. धूरक्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. बोरीवली-दहिसर लिंक रोडही याला अपवाद नव्हता.
मुंबईप्रमाणेच राज्याच्या प्रमुख शहरांच्या किमान तापमानात शनिवारी चढउतार नोंदविण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
उद्या किमान तापमान २२ अंश सेल्सिअस
च्वातावरणाच्या खालच्या स्तरात धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे धूरक्यात वाढ झाली आहे. धुळीच्या कणांचे वाढते प्रमाण व वातावरणातील इतर घटक यास कारणीभूत आहेत.
रविवारसह सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २२ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला.
आर्द्रता वाढली कुलाबा वेधशाळेत आर्द्रतेचे प्रमाण ९४ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. तर सांताक्रुझ वेधशाळेत आर्द्रतेचे प्रमाण ९५ टक्के नोंदविले आहे. आर्द्रता वाढण्यासह अरबी समुद्रावरील वातावरणातील ओलाव्याचे प्रमाण वाढले आहे. धुके वाढण्यामागचे हेदेखील एक कारण असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.