‘जानाई’ची पालखी तिवकणेकडे रवाना
By admin | Published: March 1, 2017 01:00 AM2017-03-01T01:00:47+5:302017-03-01T01:00:47+5:30
जानाईदेवीच्या पालखी सोहळ्याने आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील तिवकणे (ता. पाटण) येथील मूळ ठिकाणाकडे यात्रेसाठी मंगळवारी रवाना
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीची ग्रंथदेवता जानाईदेवीच्या पालखी सोहळ्याने आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील तिवकणे (ता. पाटण) येथील मूळ ठिकाणाकडे यात्रेसाठी मंगळवारी रवाना झाली. जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे यांनी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोहळ्याला निरोप दिला.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीची ग्रामदेवता जानाईदेवी आहे. देवीचे मूळ ठिकाण निवकणे (ता. पाटण) हे असून, दरवर्षी तेथे मोठी यात्रा भरत असते. या वर्षी ६ मार्च रोजी देवीची यात्रा असून, आज जानाईदेवीच्या पालखी सोहळ्याने निवकणेकडे प्रस्थान केले.
परवा महाशिवरात्रीच्या दिवशी खंडोबादेवाच्या भेटीसाठी वाजतगाजत पालखी जेजुरीगडावर नेण्यात आली. देवभेटीनंतर जानाईदेवीच्या मंदिरातून रथासह पालखी सोहळ्याची शहरातून मिरवणूक काढून तीन दिवसांच्या मुक्कामासाठी जेजुरी येथील अप्पासाहेब बारभाई (मेंडकेवाडा) ठेवण्यात आली होती. आज (दि. २८) पालखी सोहळ्याने दुपारी ३ वाजता निवकने यात्रेसाठी कूच केले. साडेचार वाजता गावाची शीव दौंडज खिंड येथे सोहळ्याने विसावा घेतला. या वेळी शहरातील व परिसरातील हजारो भाविकांनी सोहळ्याला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी समीर भूमकर, माजी आमदार चंदुकाका जगताप, मार्केट कमिटीचे सभापती नंदुकाका जगताप, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक महेश दरेकर, सचिन सोनवणे, अजिंक्य जगताप, बाळासाहेब सातभाई, गणेश शिंदे, योगेश जगताप, अरुण बारभाई, नगरसेविका वृषाली कुंभार, रुक्मिणी जगताप, साधना लाखे, सुजाता झगडे, मंगल दोडके, देवसंस्थानचे विश्वस्त सुधीर गोडसे, माजी नगरसेवक रोहिदास कुंभार, रमेश गावडे, गणेश आगलावे, सदाशिव बारसुडे, रवी जोशी आदींसह अनेक मान्यवरही या वेळी उपस्थित होते.
जेजुरी शिवेवर दौंडज खिंडीत परडीपूजनाने सोहळ्याने प्रस्थान ठेवले. रात्री कामठवाडी येथे मुक्काम झाला.
या पालखी सोहळ्याचे नियोजन नागू माळी पालखी सोहळा ट्रस्ट, जानाईदेवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा ट्रस्ट, तसेच समस्त ग्रामस्थ जानाई पदयात्रा तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्यात सर्व धार्मिक विधी, अन्नदान, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
>साडीचोळीचे वाटप : कावरदार डोंगरावर पूजा
बुधवारी (दि. १) सकाळी नीरा नदीवर दत्तघाटावर स्नान व परडीपूजन, सालपे येथे मुक्काम, दि. २ रोजी वडूथ, दि. ३ रोजी श्रीक्षेत्र माहुली येथे कृष्णा नदीवर स्नान, अभिषेक व धार्मिक कार्यक्रम व मुक्काम, दि. ४ रोजी तारळे, दि. ५ रोजी सकाळी कावदरा डोंगरावर निसर्गपूजा, स्थानिक आदिवासी महिला व कुमारिका यांना साडीचोळीचे वाटप व निवकने येथे पालखी सोहळा पोहोचणार आहे. दि. ६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, पहाटे क्षेत्र धारेश्वर येथे देवीचे स्नान, निवकणे येथे ग्रामस्थांच्या वतीने पूजा अभिषेक, चौक, महाप्रसाद, रात्री देवीचा छबिना, देवीचा जागर, दि. ७ रोजी चौक फुटून पालखी सोहळा परतीचा प्रवास सुरू होईल, अशी माहिती जानाईदेवीचे मानकरी नागनाथ झगडे यांनी सांगितले.