मुंबईचा पारा वाढला; तापमान ३७ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 06:25 AM2018-10-14T06:25:17+5:302018-10-14T06:25:33+5:30
मुंबई : आॅक्टोबर हीटच्या झळांचा तडाखा वाढतच असून, सांताक्रुझ आणि कुलाबा या दोन्ही वेधशाळांमध्ये शनिवारी कमाल तापमानाची नोंद ३७ ...
मुंबई : आॅक्टोबर हीटच्या झळांचा तडाखा वाढतच असून, सांताक्रुझ आणि कुलाबा या दोन्ही वेधशाळांमध्ये शनिवारी कमाल तापमानाची नोंद ३७ अंश झाली आहे. परिणामी, वाढते कमाल तापमान, वाहते उष्ण वारे आणि उकाडा मुंबईकरांचा घाम काढत असून, उत्तरोत्तर यात वाढच नोंदविण्यात येणार आहे. दरम्यान, पश्चिम मध्य अरबी समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात उतरू नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
असे असेल हवामान
- १४ ते १६ आॅक्टोबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
- १७ आॅक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील.
- १४ आणि १५ आॅक्टोबर : आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २७ अंशाच्या आसपास राहील.