गेल्या १२ वर्षानंतर परिवहन विभागाला मिळणार मे २०१८ मध्ये आगार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 04:07 PM2017-12-22T16:07:14+5:302017-12-22T16:12:44+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र बस स्थानकासह आगारापासुन वंचित ठेवण्यात आला आहे. यापैकी विभागाला येत्या मे २०१८ मध्ये आगाराचा आधार मिळणार असल्याने त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाची स्थापना २००५ मध्ये होऊन हा विभाग मात्र बस स्थानकासह आगारापासुन वंचित ठेवण्यात आला आहे. यापैकी विभागाला येत्या मे २०१८ मध्ये आगाराचा आधार मिळणार असल्याने त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.
एसटीने मीरा-भार्इंदर शहरांतर्गत आपला प्रवास २००५ मध्ये बंद केल्यानंतर पालिकेने सुरुवातीला कंत्राटी पद्धतीवर स्थानिक परिवहन सेवा सुरु केली. त्यासाठी कंत्राटदारांना ५० बस खरेदी करुन देत सेवा चालविण्यासाठी एका बसच्या मागे प्रती किमी १९ रुपये दर अदा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राजकीय साटेलोट्यामुळे विभागाचा तोटा वाढू लागल्याने पालिकेने ती सेवा मोडीत काढून १० आॅक्टोबर २०१० मध्ये केंद्र सरकारच्या तत्कालिन जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत नवीन खाजगी-लोक सहभाग तत्वावर सेवा सुरु केली. या योजनेंतर्गत २५० बस खरेदीच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिल्याने सुरुवातीला ५० बस खरेदी करण्यात आल्या. हि सेवा दोन वर्षांतच असमाधानकारक ठरून सतत तोट्यात जाऊ लागल्याने कंत्राटदाराने सेवा चालविण्यास असमर्थता दर्शविली. यामुळे पालिकेने हि सेवा देखील मोडीत काढून २५ सप्टेंबर २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुन्हा नवीन कंत्राटावर स्थानिक परिवहन सेवा सुरु करण्यात आली. त्यासाठी १०० बस खरेदी करण्यात आल्या असल्या तरी आत्तापर्यंत केवळ ४८ बसच सेवेत सामावुन घेण्यात आल्या आहेत. उर्वरीत बस आगाराअभावी बस कंपनीत धुळ खात पडल्या आहेत. या सर्व सेवा सुरु करताना पालिकेने कंत्राटदारांसोबत केलेल्या करारात आगाराची सोय उपलब्ध करुन देण्याचा उल्लेख केला असला तरी अद्यापही आगार उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. आजही बसस्थानके व आगाराअभावी सेवा कंत्राटी पद्धतीवरच सुरु असली तरी पालिकेने मीरारोडच्या कनाकिया व प्लेझंट पार्क येथे बस पार्कींगसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यापैकी कनाकिया येथील जागेत जुन्या कंत्राटातील ५० नादुरुस्त बस ठेवण्यात आल्या असुन प्लेझंट पार्क येथे सध्या बस पार्क करण्यात येत आहेत. या ठिकाणी देखील पुरेशा सोईसुविधा नसल्याने कर्मचाय््राांत नाराजी पसरली आहे. हि नाराजी येत्या काही महिन्यांत दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडुन सुरु करण्यात आल्याचे आयुक्तांकडुन सांगण्यात आले. परिवहन विभागासाठी घोडबंदर येथील ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या आरक्षण क्रमांक ३२६अ वरील ५ एकर जागेवर आगाराची दुमजली इमारत बांधण्यात येत आहे. या आगारात एकावेळी २३ बस उभ्या करता येणार असुन तळमजल्यावर कॅश कलेक्शन सेंटर, कॉन्फरन्स रुम, कंट्रोलर अलोकेशन सेंटर व नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर चालक, वाहकांसाठी विश्रांती कक्ष, अधिकारी व कर्मचारी बैठक व्यवस्थेची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दुसय््राा मजल्यावर अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कक्षासह कॅन्टीनची सोय करण्यात येणार आहे. तसेच या मुख्य दुमजली इमारतीमागील एकमजली इमारतीत बसची देखभाल व दुरुस्तीची कार्यशाळा सुरु करण्यात येणार आहे. आगारातच बसमध्ये इंधन भरण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार असुन त्यासाठी दोन यंत्र बसविण्यात येणार आहेत. यासाठी एकुण ३६ कोटींचा खर्च होणार असुन या आगारात अद्यावत संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्यात इमारत व्यवस्थापन सॉफ्टवेअर व पार्कींग व्यवस्थापन सिस्टीमचा समावेश आहे. या आगाराचा वापर येत्या मे २०१८ मध्ये सुरु होणार असुन त्यादृष्टीने कामे पुर्ण करण्यात येत असल्याचे आयुक्तांकडुन सांगण्यात आले.