जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांना सांगीतिक श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 12:56 PM2017-10-15T12:56:04+5:302017-10-15T12:57:07+5:30
जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांचे 7 सप्टेंबर रोजी निधन झाले. तबला आणि सतार सातासमुद्रापार घेऊन जाणारे मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे पं. पवार.
डोंबिवली- जगतविख्यात तबलापटू पंडित सदाशिव पवार यांचे 7 सप्टेंबर रोजी निधन झाले. तबला आणि सतार सातासमुद्रापार घेऊन जाणारे मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजे पं. पवार. नाद हा ब्रम्ह आहे, त्या नादात गुंतलेला महायोगी म्हणजे पंडित पवार. ते नेहमीच समधीअवस्थेत होते.सहज समधीवस्था असे त्या अवस्थेला म्हणतात. नेहमी आनंद, समाधानी स्वभाव. आनंद पैसा खर्च करून मिळत नाही, तो आंतरिक असावा लागतो. सदाशिव पवार अकादमी जिवंत रहावी असे आवाहन स्वामी अच्युतानंद सरस्वती डॉ.वेणीमधव उपासनी यांनी शिष्यगणाला केले.
डोंबिवलीत शिवसंस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमाने पंडित पवार यांना श्रद्धांजली सभेचे रविवारी आदित्य मंगल कार्यालयात आयोजन केले होते. त्याला शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, कै.पवार यांचे शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रख्यात गायक सुरेश वाडकर हे पवार यांचे शिष्य. कै.पंडित चतुर्भुज राठोड हे कै.पवार यांचे गुरू. पं.पवार यांनी अनेक वर्षे बारा-बारा तास रियाज केला. असंख्य कार्यक्रमांच्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी रियाज सोडला नाही. ही स्फूर्ती कशी मिळायची हे त्यांच्या संगीत साधनेचे फलित होते. संगीत सेवा करताना त्यांनी कधीही मानधनाचा विचार केला नाही. अर्थार्जन हा विषय त्यांना पटत नसे, कला सादर करणे त्यातून आत्मानंद मिळवणे आणि रसिकांना तो देणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी शिष्याना आवर्जून सांगितले. 28 जुलै रोजी आम्ही त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर 7 सप्टेंबरला त्यांचे निधन झाले. त्यांचा धावता जीवनपट ज्ञानेश्ववर मंगल कार्यलय संस्थेचे सुधीर बर्डे यांनी विशद केले. पंडित चंद्रशेखर वझे यांनी गुरुवंदना म्हणून आदरांजली वाहिली. वर्षा क्षिरसागर यांनी गुरू प्रेमापोटी 'श्रद्धांजली' ही कविता सादर केली. प्रसाद भागवत यांनी शेकडो विद्यार्थ्यांच्यावतीने आठवणी सांगून स्मृतींना उजाळा दिला.
त्यावेळी निषाद, रूपक यांच्यासह कै.पंडित पवार यांचे कुटुंबीय, गणेश मंदिर संस्थानाचे विश्वस्त प्रवीण दुधे, शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक भाऊ चौधरी, ललित शाईवाले, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, श्री गोविंदानंद श्रीराम मंदिराचे अनिकेत घमंडी, हेरंब म्युझिक अकादमीचे अरविंद पोंक्षे, गायक व दन्तचिकित्सक डॉ.प्रशांत सुवर्णा, शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील, पं.मारुती पाटील, तात्या माने, कविता गावंड, कै. पवार यांचे ठाणे जिल्ह्यातील शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण दुधे यांनी केले. संगीत सभेने पवार यांच्या श्रद्धांजली सभेची सांगता झाली. निषाद आणि रूपक पवार यांनी तबला वादन करून आम्ही चालवू पुढे हा वारसा हीच वडिलांना आदरांजली असेल असे निषाद पवार यांनी सांगितले. जयपूरला कै. पवार यांनी सादर केलेली संगीतसेवेची चित्रफीत उपस्थितांना जास्त भावली. त्यांच्या संगीतसाधनेतील योगदानाचा इतिहासात जमा न होता ते योगदान चिरंतन रहावे असे भावपूर्ण उद्गार रसिकांनी व्यक्त केले.