राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प गरजेचा - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 12:26 PM2018-06-28T12:26:22+5:302018-06-28T12:26:41+5:30
नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
मुंबई- नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. काहींचा विरोध आहे, पण चर्चे वाद सोडवू, असंही फडणवीस म्हणाले आहेत. नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना आणि नारायण राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या आहेत. त्यामुळे सरकार हा प्रकल्प रेटून नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, प्रसंगी भाजपाने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा फेकेन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत निषेध नोंदवला. नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतले नसल्याची तक्रारही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. तर दुसरीकडे, नाणार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट देण्यास नकार देत प्रस्ताव फेटाळून लावला होता. करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर भेट कशासाठी?, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भेटीचा प्रस्ताव फेटाळला होता.