नारायण राणे आणि उद्धव ठाकरे तब्बल 12 वर्षानंतर एकाच मंचावर
By admin | Published: June 23, 2017 08:14 PM2017-06-23T20:14:54+5:302017-06-23T20:26:36+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे तब्बल 12 वर्षांनी एकाच मंचावर आले
Next
>ऑनलाइन लोकमत
सिंधुदूर्ग, दि. 23 - राजकारणात काहीही अशक्य नाही असं म्हणतात....याचा प्रत्यय आज सिंधुदूर्गकरांना आला जेव्हा राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे एकाच मंचावर आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर तब्बल 12 वर्षांनी एकत्र आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते.
नारायण राणेंनी यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. इतकंच नाही तर नरेंद्र आणि देवेंद्र सरकारचंही तोंडभरुन कौतुक केलं. विशेष म्हणजे नारायण राणे यांनी कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं स्वागत केलं. नेहमी एकमेकांवर टीका करत चेहराही न पाहणारे विरोधक आज एकमेकांचं स्वागत करत असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
त्यातच राणेंनी गडकरींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केली होती. मुख्य म्हणजे बॅनरमधून काँग्रेसचा हातही गायब होता. "राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र विकासासाठी प्रयत्न करत आहेत. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये. जिथे विकास आहे, तिथे पक्षीय राजकारण करु नये", असं यावेळी नारायण राणे बोलले आहेत. यावेळी नारायण राणेंनी नितीन गडकरींचा विकासपुरुष म्हणून उल्लेख केला. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.
उद्धव ठाकरेंसंबंधी बोलताना आपण टीका करताना कधीही त्यांचा एकेरी उल्लेख केला नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनीदेखील भाषणात बोलताना नारायण राणेंचा उल्लेख करत नारायणराव राणे माझे पूर्वीचे सहकारी असल्याचं सांगितलं. ""कोकण मुंबई हृदय एकच आहे. रस्ते अरुंद असले तरी हृदय विशाल आहेत या चौपदरीकरणामुळे मुंबईतले कोकणी वेगानं गावी येतील", असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. उद्धव ठाकरे भाषण करत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली, यावर हा तर आशिर्वाद असल्याचं ते बोलले. ""या सुख सोयी स्थानिकांना हव्यात उप-यांना नको"", असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.