नरेंद्र मोदींची पहिली ‘चाय पे चर्चा’ रंगलेली दाभडीत; पण गावकऱ्यांकडून मतदानावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:28 PM2019-03-22T16:28:59+5:302019-03-22T16:30:11+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ : पाच वर्षांत विकास कामे झाली नसल्याने रोष

Narendra Modi's first 'Chai Pe Charcha' was in Dabhadi; But boycott on voting by the villagers | नरेंद्र मोदींची पहिली ‘चाय पे चर्चा’ रंगलेली दाभडीत; पण गावकऱ्यांकडून मतदानावर बहिष्कार

नरेंद्र मोदींची पहिली ‘चाय पे चर्चा’ रंगलेली दाभडीत; पण गावकऱ्यांकडून मतदानावर बहिष्कार

googlenewsNext

- हरिओम बघेल
आर्णी (यवतमाळ) : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी ज्या दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा बिगूल फुंकला होता त्याच गावाने आता पाच वर्षानंतर कोणताही विकास न झाल्याने मतदानावर बहिष्काराची घोषणा केली आहे. 


दाभडी हे गाव यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुका तसेच विधानसभा मतदारसंघ व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. शुक्रवारी २२ मार्च रोजी दाभडी गावात एक बैठक पार पडली. त्यात यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आर्णी पोलिसांच्या नावाने निवेदन तयार करण्यात आले असून त्यावर दाभडीचे उपसरपंच मिलिंद बागेश्वर, माजी सरपंच दिगांबर गुल्हाने यांच्यासह २५ नागरिकांच्या प्रातिनिधीक स्वाक्षऱ्या आहेत. या बहिष्कारामागे विकास कामे हे प्रमुख कारण सांगितले गेले. दाभडी येथील देवस्थान ते गावाला जोडणाऱ्या नादुरुस्त पुलाचे काम गेल्या पाच वर्षांत पूर्ण होऊ शकले नाही हा गावकऱ्यांच्या रोषाचा प्रमुख मुद्दा आहे. या पुलाबाबत चंद्रपूरचे खासदार तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला गेला. मात्र काम न झाल्याने अखेर वैतागून बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बैठकीतील उपस्थितांनी सांगितले. 


याशिवाय गावात अशी अनेक विकास कामे प्रलंबित असल्याचे सांगितले गेले. २०१४ ला नरेंद्र मोदी यांनी याच दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम आयोजित करून सॅटेलाईटद्वारे २३ राज्यातील शेतकऱ्यांशी एकाच वेळी संवाद साधला होता. भाजपाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ येतील असे आश्वासन मोदींनी दिले होते. परंतु प्रत्यक्षात शेतकरी तर सोडा गेल्या पाच वर्षांत जेथून घोषणा झाली त्या दाभडी गावालाही ‘अच्छे दिन’ आले नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा संयम सुटला व त्यांनी थेट मतदानावरच बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली आहे. 

 

गावातील महत्वाचा पूल गेल्या पाच वर्षात सतत पाठपुरावा करूनही पूर्ण होऊ शकला नाही. बाकी विकास कामे तर दूरच राहिली. त्यामुळेच नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला. 
- अतुल इंगळे
शेतकरी, दाभडी ता. आर्णी 


मतदानावरील बहिष्काराबाबत ठराव झाला नाही किंवा ग्रामसभेत चर्चा झाली नाही. गावात विकास कामे सुरू आहे. त्यात पूलसुद्धा केला जाईल. हा पुल नादुरुस्त असून तो दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकणे हा उपाय होऊ शकत नाही, आम्ही बहिष्कार टाकणार नाही. 
- मंगला धकाते
सरपंच, दाभडी ता. आर्णी.

Web Title: Narendra Modi's first 'Chai Pe Charcha' was in Dabhadi; But boycott on voting by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.