उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 07:30 AM2024-05-06T07:30:45+5:302024-05-06T07:32:16+5:30

Nashik Loksabha Election - नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी अखेर उबाठा गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Nashik Lok Sabha Constituency - Uddhav Thackeray faction leader Vijay Karanjkar joins CM Eknath Shinde's Shiv Sena | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

मुंबई - Vijay Karanjkar Joined Shivsena ( Marathi News ) नाशिक लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे विजय करंजकर हे नाराज झाले होते. करंजकर हे उबाठा गटाचे लोकसभा संघटक म्हणून काम करत होते. मात्र आता विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. करंजकर हे लोकसभेची जोरदार तयारी करत होते. परंतु ऐनवेळी उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला आणि मला तिकिट नाकारलं असा आरोप करंजकर यांनी केला होता. 

रात्री उशिरा विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी ते म्हणाले की, शिवसैनिकांचा कैवारी म्हणून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेली १३ वर्ष मी शिवसैनिक म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वाप्रमाणे काम केले. ३ वेळा लोकसभेला इच्छुक होते. गेल्या दीड वर्षापासून मी लोकसभा मतदारसंघ फिरून प्रचार, प्रसार केला. पण ऐनवेळी जे इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी देऊन माझ्याशी विश्वासघात, गद्दारी केली. जी काही माझी फसवणूक झाली त्याची दखलही कुणी घेतली नाही. बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं काम न करता संघटनेत काम सुरू आहे असा आरोप करंजकरांनी केला. 

तसेच सध्याच्या उबाठा गटात तत्व आणि सत्व उरलं नाही. मातोश्रीच्या आजूबाजूला अशी लोक फिरतायेत, ते जे घात करतायेत त्यांना अद्दल घडेल. पडद्याआडचे गद्दार मातोश्रीवर लपलेले आहेत. आगामी काळात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना अभिप्रेत असलेले काम एकनाथ  शिंदेंच्या नेतृत्वात करून दाखवू असा विश्वास विजय करंजकर यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, जे आमच्यावर आरोप करतात, त्यांनी आधी आत्मपरिक्षण केले पाहिजे त्यानंतर दुसऱ्यावर आरोप केले पाहिजेत. विजय करंजकरांसारखा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे. तुम्ही तिथे होता तोपर्यंत उत्तम पदाधिकारी आणि कचरा म्हणून बोललं जाईल. ५० आमदार, १३ खासदार यांच्यासह शेकडो पदाधिकारी आज शिवसेनेत येतायेत. हे सर्व चुकीचे आणि एक माणूस बरोबर असं होत नाही. त्यांना सल्ले देत नाही. ते मोठमोठ्या लोकांना सल्ले देतात, सुप्रीम कोर्टालाही सल्ले देतात असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

विजय करंजकरांवर शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी

कुणासोबतही असा विश्वासघात, फसवणूक होता कामा नये, मी भला, माझं कुटुंब भलं एवढ्यापुरते मर्यादित असलेल्या उद्धव ठाकरेंकडून दुसरी अपेक्षा नाही. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक, कुशल संघटक, संघटनेसाठी जीवाची पर्वा न करता वाहून घेणारा कार्यकर्ता विजय करंजकर आज आमच्यासोबत आलेत, त्यांचे स्वागत करतो असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. विजय करंजकर यांची शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. 

Web Title: Nashik Lok Sabha Constituency - Uddhav Thackeray faction leader Vijay Karanjkar joins CM Eknath Shinde's Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.