‘नॅशनल अॅनिमेशन अॅन्ड गेमिंग इन्स्टिट्यूट उभारणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2016 01:21 AM2016-01-30T01:21:24+5:302016-01-30T01:21:24+5:30
मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘नॅशनल अॅनिमेशन अॅण्ड गेमिंग इन्स्टिट्यूट’ची उभारणी करणार असून, त्याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत. त्यासाठी चित्रपटनगरीमध्ये जागा
मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘नॅशनल अॅनिमेशन अॅण्ड गेमिंग इन्स्टिट्यूट’ची उभारणी करणार असून, त्याबाबत केंद्र सरकारशी बोलणी सुरू आहेत. त्यासाठी चित्रपटनगरीमध्ये जागा देण्याची तयारी राज्य सरकारने केली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
१४व्या मुंबई आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रवींद्र नाट्य मंदिर येथे शुक्रवारी झाले. मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईची ओळख ही देशाच्या आर्थिक राजधानीबरोबरच ‘एंटरटेन्मेंट कॅपिटल’ अशी झाली आहे. लघुपट हे माहितीप्रधान असतात व त्याचा परिणाम सर्वदूर होत असतो. त्यामुळे जीवनातील विविधतेचा प्रत्यय येतो, असेही फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड म्हणाले, की लघुपट व माहितीपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असून, त्यांचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. दूरदर्शनच्या वाहिनीवर लघुपट व माहितीपटांचे प्रसारण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने ‘डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ माहितीपट निर्माते नरेश बेदी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नरेश बेदी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल व महोत्सवाचे ब्रँड अॅम्बॅसेडर जॅकी
श्रॉफ यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महोत्सवाचे संचालक
मुकेश शर्मा, माईक पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)