काल भ्याड हल्ला, आज धमकी; भूसुरुंग स्फोटानंतर नक्षल्यांची बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 12:22 PM2019-05-02T12:22:24+5:302019-05-02T12:23:07+5:30
कालच्या या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे.
गडचिरोली: येथील जांभुरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी काल भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले. कालच्या या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक गावांमध्ये लावण्यात आले आहेत.
या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सद्वारे एप्रिल 2018 मध्ये कसनसूर येथे झालेल्या 40 नक्षलींच्या एन्काऊंटरचा निषेध नोंदवण्यात आला आहे. 27 एप्रिल 2019 रोजी डिव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हिचा देखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचा सुद्धा निषेध करण्यात आला आहे. याचबरोबर, आज राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.
Union Minister of State for Home Hansraj Ahir to visit the site of #Gadchiroli Naxal attack, today. pic.twitter.com/Ok3lV8aKXC
— ANI (@ANI) May 2, 2019
नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या 36 वाहनांची जाळपोळ केली होती. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम)चे 15 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये गडचिरोलीमधील सहा, भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तसेच हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे.
Maharashtra: DGP, IG, SP Gadchiroli, Collector Gadchiroli, and anti-naxal operation officials reach Gadchiroli naxal attack site, where 15 security personnel and 1 driver lost their lives yesterday. pic.twitter.com/hQG8XXNFZL
— ANI (@ANI) May 2, 2019