नगरमधील बंडखोर नगरसेवकांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी, आमदारांना मात्र अभय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 04:29 PM2019-01-12T16:29:32+5:302019-01-12T16:53:17+5:30
महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली
अहमदनगर - महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणाऱ्या १८ नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. याशिवाय शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. मात्र आमदार संग्राम जगताप यांना अभय मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा आदेश काढला आहे.
अहमदनगर महापौर निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. शिवसेनेला सवार्धिक २४ जागा मिळवूनही महापौर पदापासून वंचित राहावे लागते. राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार अहमदनगर येथे आले असता पाठींबा देणारांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. मात्र आमदार संग्राम जगताप यांच़्यावर कारवाई करण्यात आली नाही.
महापौर पदाच्या निवडणुकीसाठी जातीयवादी पक्षांना पाठींबा देऊ नये अथवा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान करू नये, असे स्पष्ट आदेश पक्षाने दिलेले होते. परंतु पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या नगरसेवकांनी भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवारासा पाठींबा देऊन मतदान केलेले आहे. अशा प्रकारच्या पक्षविरोधी घडामोडी होत असताना याबाबतची माहिती अथवा कल्पनाही आपण पक्षश्रेष्ठींना दिलेली नव्हती. याबाबतचे स्पष्टीकरण ७ दिवसांत करावे म्हणून आपणास नोटीस पाठविण्यात आलेली होती. आपण याबाबत अद्यापपावेतो खुलासा न केल्यामुळे आपण पक्षशिस्त भंग केलेली आहे. म्हणून आपणास अध्यक्षपदावरून टाकण्यात येत आहे. बडतर्फ करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ही कारवाई १८ नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यावर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून बडतर्फ केलेल्या नगरसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. सागर बोरूडे, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर,
संपत बारस्कर, विनित पाउलबुद्धे, सुनील त्रंबके, समद खान, ज्योती गाडे, शोभा बोरकर, कुमार वाकळे, रूपाली जोसेफ पारघे, अविनाश घुले, परवीन कुरेशी, शेख नजिर अहमद, प्रकाश भागानगरे, शीतल जगताप, गणेश भोसले.
Maharashtra: Nationalist Congress Party (NCP) expels 18 corporators of Ahmednagar Municipal Corporation who voted for BJP's candidate during mayoral elections last month. The party has also suspended Ahmednagar district president for not having any idea about the defection.
— ANI (@ANI) January 12, 2019