राज ठाकरेंच्या भेटीत काय घडले?; अजित पवारांच्या विधानातून सगळ्यांनाच कळले!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:53 PM2019-02-14T15:53:12+5:302019-02-14T16:44:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाणार का, यावरून गेले काही दिवस तर्कवितर्क लढवले जाताहेत.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाणार का, यावरून गेले काही दिवस तर्कवितर्क लढवले जाताहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात तीन जागांवरून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, राज यांच्याशी निवडणुकीशी संबंधित कुठलीही चर्चा झालेली नाही आणि होण्याची शक्यताही नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं. परंतु, 'पवारकाकां'च्या या खुलाशानंतर पुतणे अजित पवार यांनी वेगळंच मत मांडलं. राज ठाकरेंना महाआघाडीत सामावून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि आता तर ते याबाबत अधिकच आग्रही दिसताहेत.
मोदी सरकारविरोधातील महाआघाडी भक्कम करायची असेल तर राज ठाकरे यांना सोबत घ्यावं लागेल. त्याबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे आणि या संदर्भात आपण पुन्हा राज ठाकरेंना भेटून चर्चा करू, असं अजित पवार यांनी आज सांगितलं. कालच, दादरमधील एका मित्राच्या घरी अजित पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. या बैठकीत मनसेचं 'इंजिन' महाआघाडीच्या दिशेनं निघालंय आणि त्याच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीही उत्सुक असल्याचे संकेतच अजित पवार यांच्या आजच्या विधानातून मिळत आहेत.
दरम्यान, मनसेसोबत आघाडीशी शक्यता शरद पवारांनी फेटाळून लावल्यानंतरही, राज ठाकरेंना महाआघाडीत येण्याचं आवाहन अजित पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी केलं होतं. 'प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यांना मानणारा असा मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना लाख लाख दीड लाख मते घेतल्याचे तुम्ही पाहिले असेलच. मनसेबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तसेच काँग्रेसने वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र असे असले तरी आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळणे गरजेचे आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे असे मला वाटते.''