...तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो MIDC तुमच्यामुळेच झाली; रोहित पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 03:15 PM2023-12-16T15:15:38+5:302023-12-16T15:18:40+5:30

राजकीय स्वार्थासाठी जनहिताचा बळी देणाऱ्या व्यक्तीच्या दबावापोटी लाखो लोकांच्या भविष्याशी खेळणं सरकारला शोभते का? असा खोचक सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

ncp mla rohit pawar slams bjp leader ram shinde over midc in karjat jamkhed | ...तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो MIDC तुमच्यामुळेच झाली; रोहित पवारांचा संताप

...तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो MIDC तुमच्यामुळेच झाली; रोहित पवारांचा संताप

अहमदनगर : गेल्या काही महिन्यांपासून कर्जत-जामखेडमधील एमआयडीचा मुद्दा चर्चेत असून राजकीय कुरघोडीमुळे या एमआयडीसाला मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे. राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही रोहित पवारांनी हा मुद्दा उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसंच रोहित यांनी आता सोशल मीडिया हँडलवर याबाबत एक पोस्ट लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे.

"तुम्हाला एमआयडीसीचं श्रेयच हवं असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ही एमआयडीसी तुमच्यामुळेच झाली. पण असले रिकामे उद्योग कशाला करता? तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीब जनतेला, पुढच्या पिढ्यांना कशात अडचणीत आणता?" असा सवाल रोहित पवार यांनी आपल्या राजकीय विरोधकांना विचारला आहे.

"फक्त एक सही तेवढी बाकी आहे" 

एमआयडीसीबाबत आपली भूमिका मांडताना रोहित पवारांनी लिहिलं आहे की, "एखाद्या भागात उद्योग व्यवसाय आल्याने त्या भागाची होणारी भरभराट मी पाहिली आहे. त्या भागातल्या सर्वसामान्यांचे उंचावणारे जीवनमान मी पाहिले आहे. ज्याप्रमाणे योग्य नियोजन करून बारामती, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर यासारख्या अनेक भागात औद्योगिक विकास झाला, भरभराट झाली तोच विकास तीच भरभराट माझ्या भागातही व्हावी, ही माझी साधी इच्छा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे. युवा संघर्ष यात्रेत चालत असताना सुद्धा प्रत्येक भागात त्या-त्या जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यात एमआयडीसी व्हाव्यात ही युवा वर्गाची मागणी समोर आली. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे, लढत आहे. सर्व काही झालं आहे, सर्वेक्षण झालं आहे, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, फक्त एक सही तेवढी बाकी आहे. परंतु केवळ राजकीय श्रेयवादातून एमआयडीसी जाणून बुजून रोखली जात आहे," असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

शिंदे, फडणवीस, अजित पवारांना आवाहन
 
भाजपचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल करत रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "एखाद्या बिनडोक, कुठलीही दूरदृष्टी नसलेल्या आणि राजकीय स्वार्थासाठी जनहिताचा बळी देणाऱ्या व्यक्तीच्या दबावापोटी लाखो लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का? मा. एकनाथजी शिंदे साहेब,  मा. अजितदादा, मा. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही तर कार्यक्षम आहात. जनतेसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य हे किमान तुम्हाला तरी कळायला हवे. सरकारच्या याच धोरणामुळे राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत आणि नवे उद्योग यायला तयार नाहीत. BANK Assisted project च्या गुंतवणुकीत उत्तरप्रदेश ४३१८० कोटी, गुजरात ३७३१७ कोटी, ओडीसा ११८१० कोटी ही राज्य पहिल्या तीन मध्ये आहेत तर महाराष्ट्र ७९०० कोटी च्या गुंतवणुकीसह चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. हे असंच चालू राहिलं तर उद्याची पिढी तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही. हे असं अधोगतीकडे नेणारे राजकारण महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. विकासाचं राजकारण करायचं की काही बिनडोक लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून अधोगतीचं राजकारण करायचं याचा विचार राज्याच्या नेतृत्वाने करायला हवा. त्यामुळं कुठलाही आकस न ठेवता आणि कोणत्याही दबावाला भीक न घालता कर्जत–जामखेडच्या १००० एकर हून मोठ्या एमआयडीसीला आपण तातडीने मंजुरी द्यावी," अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.

Web Title: ncp mla rohit pawar slams bjp leader ram shinde over midc in karjat jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.