उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:41 PM2018-10-09T12:41:10+5:302018-10-09T12:46:39+5:30
राष्ट्रवादीतून उदयनराजेंच्या उमेदवारीला वाढता विरोध
सातारा: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे. मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, ही भेट अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीबद्दलची चर्चा झाली. त्या बैठकीत साताऱ्यातील आमदार आणि नेत्यांनी उदयनराजे यांना आपला विरोध असल्याची भूमिका घेतली. यानंतर उदयनराजे आणि शरद पवार यांच्यातही चर्चा झाली. मात्र उदयनराजेंना शरद पवारांनी कोणतंही ठोस आश्वासन दिलेलं नाही. त्यामुळेच इतर पक्षातही आपले मित्र असल्याचं सूचक विधान उदयनराजेंनी पत्रकारांशी बोलताना केलं होतं. या पार्श्वभूमीवर उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी साताऱ्याहून रवाना झाले होते. त्यामुळे या भेटीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.