यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव अडचणीत : न्यू इंग्लिश शाळेने नाकारली जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 06:28 PM2018-10-08T18:28:53+5:302018-10-08T18:30:20+5:30
गेली ६५ वर्ष पुण्यासह जगभरातल्या कानसेनांच्या हृदयावर कोरलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजकांवर जागा शोधत फिरण्याची वेळ आली आहे.
पुणे : गेली ६५ वर्ष पुण्यासह जगभरातल्या कानसेनांच्या हृदयावर कोरलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजकांवर जागा शोधत फिरण्याची वेळ आली आहे. गेली अनेक वर्ष न्यू इंग्लिश स्कुल, रमणबागमध्ये भरणाऱ्या महोत्सवाला यंदा शाळेने जागा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे आयोजकांसमोर पेच निर्माण झाला आहे.
यंदाचे महोत्सवाचे ६६वे वर्ष आहे. सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्याच्या मध्यात सवाई महोत्सव अनुभवायला मिळतो. अनेक जण तारखा जाहीर झाल्यावर खास सुट्टी काढून सवाईमध्ये हजेरी लावतात. सवाईमध्ये कला सादर करणे अत्यंत मानाचे समजले जात असल्यामुळे कलाकारांचे लक्षही सवईकडे लागलेले असते. यावर्षी मात्र महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळासमोर जागेचा प्रश्न आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेली तीस वर्ष न्यू इंग्लिश स्कुलच्या मैदानावर महोत्सव पार पडतो.यावर्षीदेखील आयोजकांतर्फे शाळेला पत्र पाठवण्यात आले. त्यावर शाळेने साधारण त्याच काळात शालेय क्रीडा प्रशिक्षण वर्ग असल्यामुळे जागा देण्यास नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले की, या ठिकाणाची आता पुणेकरांना सवय झाली आहे. त्यामुळे शाळेसोबत पुन्हा संपर्क करण्यात येईल. मात्र त्यालाही यश आले नाही तर इतर पर्यायांचाही विचार सुरु आहे.