भालचंद्र मुणगेकर यांची शोषितांसाठी नवी इनिंग

By admin | Published: July 21, 2016 05:19 AM2016-07-21T05:19:24+5:302016-07-21T05:19:24+5:30

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी परळ येथील दामोदर सभागृहात ‘समता अभियान’ या सामाजिक जनसंघटनेची स्थापना केली.

New Innings for Bhalchandra Mungekar's exploits | भालचंद्र मुणगेकर यांची शोषितांसाठी नवी इनिंग

भालचंद्र मुणगेकर यांची शोषितांसाठी नवी इनिंग

Next


मुंबई : मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बुधवारी परळ येथील दामोदर सभागृहात ‘समता अभियान’ या सामाजिक जनसंघटनेची स्थापना केली. याच ठिकाणी ९२ वर्षांपूर्वी म्हणजेच २० जुलै १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ या सामाजिक संघटनेची स्थापना करत आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात केली होती.
स्थापना अधिवेशनात राज्यातील सर्व विभागांतील दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लिम, शेतमजूर, महिला, सफाई कामगार, गरीब शेतकरी यांचे ५००हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र ओबीसी मुस्लिम संघटनेचे नेते शब्बीर अन्सारी, हबीब फकीर, परीट समाजाचे नेते विनायक पाटील, काका क्षीरसागर, सफाई कामगारांचे नेते सुनील चौहान, प्रा. आशालता कांबळे, डॉ. जगन कऱ्हाडे, डॉ. विलास आढाव असे अनेक महत्त्वाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी समता अभियानाची तात्त्विक आणि वैचारिक भूमिका विषद केली. आजच्या बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक वातावरणामध्ये दलित, शोषित, वंचित अशा सर्व समाज घटकांनी एकत्रित येऊन संघटितपणे आवाज उठवल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही, असे मुणगेकर यांनी सांगितले.
या अधिवेशनात सामाजिक समतेची व अभियानाची उद्दिष्टे व घटना सर्वानुमते मंजूर करण्यात आली. त्यानंतर अधिवेशनात १० महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे, दलित-आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, भटक्या आणि विमुक्त जमातीसाठी लावलेली क्रिमिलेयरची अट रद्द करणे, जातीचा दाखला देण्याची पद्धत सुटसुटीत करून जात पडताळणीचा कायदा रद्द करणे, अनूसुचित जाती आणि जमातींसाठी खास तरतूद केलेल्या निधीचा पूर्ण विनिमय करून तो इतरत्र न वळवणे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी हा दिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करणे, अनूसुचित जाती-जमाती-भटक्या विमुक्त जमाती-ओबीसी यांच्यासाठी असलेल्या राखीव जागांची पूर्णपणे अंमलबजावणी करून अनुशेष भरून काढणे हे महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. नाममात्र शुल्क भरून या जनसंघटनेत ३१ डिसेंबरपर्यंत किमान १ लाख प्राथमिक सभासद आणि १० हजार प्रतिनिधी सभासद करण्याचा संकल्प डॉ. मुणगेकर यांनी यावेळी सोडला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: New Innings for Bhalchandra Mungekar's exploits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.