निलेश राणे २९ मार्चला उमेदवारी अर्ज भरणारच; माघारीचे वृत्त नारायण राणेंनी फेटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 07:15 PM2019-03-22T19:15:20+5:302019-03-22T19:16:31+5:30
माघार घेणे हा आपला पिंड नाही, आपल्यावर कोणाचाही दबाव नाही
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकसभेचे उमेदवार तथा माजी खासदार निलेश राणे हे २९ मार्चला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत खुद्द नारायण राणे यांनी माहिती दिली आहे. पूर्ण विचार करून निलेश राणे यांना आपण उमेदवारी दिली आहे. माझ्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. माघार घेणे हा माझा पिंड नाही, असा दावा राणे यांनी केला आहे.
शिवसेना-भाजपा युती झाल्यामुळे राणे यांनी माघार घ्यावी. निलेश राणे यांनी निवडणूक लढवू नये, असे भाजप नेतृत्वाकडून सांगितले जात असल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सिंधुदुर्गनगरीत स्वाभिमान पक्षाच्या बुथ अध्यक्षांचा मेळावा शुक्रवारी पार पडला. यावेळी बोलताना राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर ही पक्षाची पहिली लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणेंची जागा काय आहे, हे आम्हाला आणि इतरांनाही कळेल. शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला. आता राणे त्यांचा पक्ष वाढविणार, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची मुलाखत लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी घेतली. यावेळी नितेश राणे यांनी नारायण राणे यांची लोकसभेसाठीची भुमिका स्पष्ट केली.
काँग्रेसने राणेंना कोणती आश्वासने दिली होती, किती पाळली ते लोकांनाही माहित आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण एका छत्रीखाली, एकाच पक्षाच्या झेंड्याखाली दिसू, त्यानंतर तुम्हाला हा प्रश्न विचारावा लागणार नाही. अडचणी असल्याने काँग्रेसमध्ये मी सध्या तांत्रिकदृष्य्ट्या आहे. राणे लपूनछपून बोलणारा नाही. ते स्पष्ट बोलतात. यामुळे जनता समजून जाईल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.