नितेश राणेंची आमदारकी रद्द करा - मेधा कुलकर्णी
By admin | Published: January 19, 2017 03:23 PM2017-01-19T15:23:09+5:302017-01-19T15:23:09+5:30
काँग्रेस नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 19 - काँग्रेस नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली आहे. संभाजी उद्यानातील पुतळा हटवल्याप्रकरणी मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.
आमदार नितेश राणे यांनी त्यासंदर्भात जाहीर विधान करून पुतळा हटवल्याप्रकरणी पाच लाख रुपयांचा धनादेशही दिला आहे. लोकप्रतिनिधींनी अशी फूस लावणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे नितेश राणेंची आमदारकी रद्द करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.
नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. त्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले होते. यात नितेश राणेंचा हात असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यातच पुतळा हटवणाऱ्यांना पाच लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे सांगत बक्षिसाचा धनादेशही देत असल्याचे राणे यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते. राणेंच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, कोथरूड नाट्य परिषद व रमाबाई आंबेडकर संस्था यांच्यातर्फे येत्या 23 जानेवारीला नाटककार राम गणेश गडकरी यांच्या 97 व्या स्मृति दिनानिमित्ताने गडकरी दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन संभाजी उद्यानात करण्यात आले आहे. पोलिसांची कार्यक्रमाला परवानगी मिळाली असून महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे वेळ पडल्यास उद्यानाबाहेर कार्यक्रम करू, असे आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.