अंबाबाईच्या मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी; पश्चिम देवस्थान समितीचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 06:36 PM2018-10-01T18:36:55+5:302018-10-01T19:12:07+5:30
महेश जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती
कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सपासून अंबाबाई मंदिरात आता महिला व मुलींना तसेच पुरुषांना पूर्ण कपड्यांत प्रवेश दिला जाणार आहे. असा निर्णय सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकारांना सांगितले की, पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत येणाऱ्या सर्व देवालयांना हळहळू टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू केला जाईल. याची सुरुवात अंबाबाई मंदिरातील देवस्थानपासून येत्या नवरात्रोत्सवापासून म्हणजेच १० ऑक्टोबरपासून होणार आहे.
हा निर्णय घेताना याविषयी महेश जाधव यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक भाविकांनी येथील श्रद्धास्थान जपले जावे, पावित्र्य राखावे यासाठी स्त्रिया, महिला, पुरुष यांनी पूर्ण कपड्यातच प्रवेश केल्यास अंबाबाई मंदिराची शोभा वाढेल असे सांगितले; याची दखल तसेच भाविकांच्या तक्रारींचा आदर आणि आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईचे श्रद्धा व पावित्र्य राखले जावे म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे शेवटी जाधव यांनी सांगितले.
यावेळी बैठकीला कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
निर्णय वादग्रस्त होण्याची शक्यता?
हा निर्णय घेतला गेल्यास यावर आता महिलावर्गातून नेमक्या कशा प्रतिक्रिया उमटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात प्रथमच अशा प्रकारचा निर्णय होत असल्याने हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.