यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानानं राज्यभरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 22:23 IST2018-09-06T22:23:31+5:302018-09-06T22:23:49+5:30
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानानं राज्यभरात खळबळ
कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढच्या काळात मी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं चंद्रकांतदादांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं भाजपासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर येथे पोलीस दलातर्फे गणराया अवॉर्ड वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केल्याने याचीच चर्चा कार्यक्रमानंतर रंगली.
गतवर्षीही मंत्री पाटील यांनी साउंड सिस्टीमविरोधात भूमिका घेतली होती. त्याचाच धागा पकडून ते म्हणाले, यापुढे मी लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद किंवा पदवीधर यांपैकी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्यामुळे गणेशोत्सवात साउंड सिस्टीम लावू नये, हा काही माझा राजकीय अजेंडा नाही. पारंपरिक वाद्य व्यावसायिकांकडून मला काही दहा टक्के कमिशन मिळत नाही. गतवर्षी कोल्हापुरातील गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्ये लावावीत, याबाबत मी अनेक मंडळांना भेटलो, त्यांचे प्रबोधन केले. या विधायक उपक्रमाचा सर्वत्र चांगला संदेश गेला. मात्र यामुळे काही मंडळे दुखावली गेली. तथापि न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ नये व सण-उत्सवांत नागरिकांचा आनंद द्विगणित व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यापासून अनेक नेत्यांनी याआधीही चंद्र्रकांत पाटील यांनी जनतेतून निवडून यावे, असे आवाहन अनेकदा केले होते. तसेच मंत्री पाटील हेच कोल्हापूर उत्तर किंवा राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवतील, अशीही चर्चा मध्यंतरी जोरदारपणे सुरू होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केल्याने ‘पदवीधर’च्या निवडणुकीसाठीही भाजपला वेगळा उमेदवार शोधावा लागणार आहे.
.......................................
निवडणूक न लढविण्याची कारणे
चंद्रकांत पाटील हे गेली अनेक वर्षे कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांच्या भाजप- शिवसेना युतीच्या राजकारणात नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत आले आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये या तीनही जिल्ह्यांमध्ये विविध संस्था आणि मतदारसंघांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी अतिशय नेमकी भूमिका बजावली आहे. या तीनही जिल्ह्यांतून आगामी विधानसभेला भाजपचे १५ उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी मंत्री पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळेच स्वत:ला कोणत्याही निवडणुकीत अडकवून घेण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला असावा, अशी पक्षामध्ये चर्चा सुरू आहे.