३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:57 PM2019-05-09T13:57:36+5:302019-05-09T14:07:27+5:30
थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला.
पुणे : साखर कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) रक्कम थकविल्या प्रकरणी साखर आयुक्तालयाकडून रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) काढण्याचा धडाका सुरु आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत ३१ कारखान्यांकडे तब्बल अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील काही कारखाने यंदाही थकबाकीदार आहेत. थकबाकीची ही कोंडी साखर आयुक्तालय कधी फोडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
थकीत एफआरपीमुळे यंदाचा हंगाम जास्त चर्चेत राहिला. शेतकरी संघटनांनी केलेले आंदोलन, साखर कारखान्यांकडून एफआरपी देण्यात होत असलेला विलंब यामुळे सहा मे अखेरीस राज्यातील ६८ कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. यंदा एप्रिल अखेरीस राज्यातील कारखान्यांकडे २२ हजार ४२ कोटी रुपयांचे देणे होते. त्यापैकी १८ हजार ८२१ कोटी २२ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. गाळप हंगाम संपूनही ३ हजार ६०७ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे.
यंदा गाळप हंगाम घेतलेल्या १९५ पैकी अवघ्या ४३ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे. शुगरकेन कंट्रोलन कायद्यानुसार शेतकºयांची एफआरपीबाबत वैयक्तीक करार झालेला नसल्यास, त्यांना १४ दिवसांत एफआरपीची रक्कम देणे बंधनकारक आहे. राज्यातील ३१ साखर कारखान्यांकडे २०११-१२ पासून ते २०१७-१८ या हंगामातील तब्बल २४९ कोटी ५२ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहेत. त्यात बीडचा जय भवानी साखर कारखाना, साताºयाचा रयत साखर कारखाना यांच्याकडे या वर्षासह पुर्वीची देखील थकबाकी दिसून येते. रयतकडे २०१४-१५मध्ये ९ कोटी ८१ लाख आणि बीडच्या जयभवानीकडे ३ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी दिसत आहे. यंदा देखील दोन्ही कारखान्यांकडे थकबाकी असून, त्यातील जयभवानी कारखान्यावर या वर्षी आरआरसी कारवाई देखील करण्यात आली आहे.
-----------------
२०११-१२ ते १७-१८ या गाळप हंगामातील प्रमुख थकबाकीदार (रक्कम कोटीत)
दौलत-कोल्हापूर १९.९६
वसंतदादा शेतकरी-सांगली ५५.४
रयत-सातारा ९.८१
न्यू फलटण ४८.४१
स्वामी समर्थ-सोलापूर ९.०७
श्री शंकर-सोलापूर ३०.७६
आर्यन शुगर-सोलापूर २१.०५
विजय शुगर-सोलापूर २०.१७
शंभू महादेव-उस्मानाबाद ११.८७
चोपडा-जळगाव १२.८२
समर्थ-जालना ३.६५
जयभवानी-बीड ३.२६
एच. जे. पाटील-नांदेड ५.५७
महाराष्ट्र शेतकरी-परभणी ९.९२