स्पेशल स्टोरी : गायीच्या पोटात अडकलेल्या वासराचा होणार सुलभ जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 07:00 AM2019-05-19T07:00:00+5:302019-05-19T07:00:08+5:30
गायी-म्हशींच्या प्रसुतीवेळी अनेकदा त्यांचे पिल्लू पोटात अडकते व त्यांना काढताना त्यांचा मृत्यू होतो.
- समिर बनकर-
बारामती : गायी-म्हशींच्या प्रसुतीवेळी अनेकदा त्यांचे पिल्लू पोटात अडकते व त्यांना काढताना त्यांचा मृत्यू होतो. मात्र, अशा वासरांना आता यापुढे सुलभ बाहेर काढत जीवदान मिळणार आहे.. बारामती तालुक्यात शिर्सुफळ येथील तरुणाने '' काल्फ एक्स्टॅक्टींग'' या अद्ययावत मशिनचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे भारतात अशा प्रकारचे यंत्र बनविण्याचा विक्रमच त्यांच्या नावावर झाला असून भारत सरकारकडून त्याला या यंत्राचे पेटेंट देखील मिळाले आहे. या यंत्राच्या शोधामुळे गायी-म्हशींच्या पोटात अडकलेल्या वासरू-रेडकू सहज बाहेर काढता येणार असून त्यांचा मृत्यू टाळता येऊ शकणार आहे.
शुभम राजेंद्र जाधव असे या संशोधक विद्यार्थ्याचे नाव आहे. माळेगाव येथील पशूसंवर्धन महाविद्यालयात शिकणाऱ्या शुभमच्या ‘काल्फ एक्सट्रॉक्टिंग मशीन’साठी भारत सरकारकडून १८ फेब्रुवारीला पेटंट जाहीर केले होते. बुधवारी (दि. १५ मे) त्याला पेटंटचे प्रमाणपत्र देखील मिळाले.
गाई म्हशीच्या प्रस्तुती दरम्यान वासरे अडकण्याचा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो या प्रकारात गाई म्हशी किंवा त्यांची वासरे मृत होण्याची शक्यता असते. याला पशुवैद्यकीय भाषेत ‘डिस्टोशिया’ असे म्हटले जाते. साधारणपणे अशा परिस्थितीत अडकलेले वासरू माणसांच्या सहाय्याने ओढले जाते. परंतू यावेळी गायी -म्हशीच्या गर्भाशयाला इजा पोहोचू शकते. सध्या विदेशी वंशाच्या गाईमध्ये डिस्टोशिया प्रकार नेहमीच पाहायला मिळतो.म्हणून पशुधन वाचविण्यासाठी आणि प्रसुती सुखकर करण्यासाठी हे मशीन शोधण्यात आले आहे. हे मशीन वासरू ओढण्याचे काम करते. ज्यामुळे गायी-म्हशीला कसल्याही प्रकारची इजा पोहचत नाही. होणारी वासरे सुद्धा सुखरूपपणे जन्म घेतात, अशा प्रकारचे यंत्र भारतात प्रथमच शोधण्यात आले आहे.
माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देखील आर्वजून या यंत्राची पाहणी करत उत्तम संशोधनाबद्दल त्याला शाब्बासकीची थाप दिली. शुभमच्या या संशोधनाच्या माध्यमातून माळेगाव येथील पशूसंवर्धन महाविद्यालयाला हे पहिलेच पेटंट मिळाले आहे. कृषी विज्ञान केंद्रामध्ये झालेल्या कृषी प्रदर्शनामध्ये या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवले होते. या यंत्राबाबत गावागावातील डेअरी फार्मवर जाऊन माहिती देण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राबद्दल माहिती घेऊन हे यंत्र वापरणार असल्याचे सांगितले.
--
* यंत्राव्दारे १.१८ मिनिटात होते प्रसुती
या यंत्राद्वारे पशूसंवर्धन महाविद्यालयातील १० गाईंची प्रसुती केली आहे. गाई-म्हशींची पोटात वासरू अडकले तर त्याला यंत्राच्या सहाय्याने अशा गाई-म्हशींची प्रसुती अवघ्या १.१८ मिनिटात होते. पूर्वी पटोत अडकलेले वासरु हाताने ओढून काढले जायचे. त्या प्रक्रियेत प्रसुती होण्यास सुमारे अर्धातासापेक्षाही अधिक वेळ लागतो. त्यामुळे जनावरांना इजा होण्याचाही मोठा धोका असतो.
--------------------------