पैशासाठी परिचारिकांचा ओढा परदेशाकडे वाढतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 08:00 AM2019-05-12T08:00:00+5:302019-05-12T09:18:41+5:30
एककाळ असा होता की वैद्यकीय क्षेत्र हे सेवाधिष्ठित मानले जायचे. मात्र आज या क्षेत्राचा व्यवसाय झाला आहे
पुणे : वैद्यकीय क्षेत्रात खासगी एजन्सींनी आता शिरकाव केला असून, परिचारिकांना क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण देत त्यांच्या परीक्षा घेऊन परदेशात पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. परिचारिका सेवेतील कमी पगार, सोयी-सुविधांचा अभाव, रिक्त पदांचा अतिरिक्त भार, बदल्या अशा स्थितीमुळे परिचारिकांचाही ओढा सातासमुद्रापार जाण्याकडे वाढत चालला असल्याचे समोर आले आहे.
एककाळ असा होता की वैद्यकीय क्षेत्र हे सेवाधिष्ठित मानले जायचे. मात्र आज या क्षेत्राचा व्यवसाय झाला आहे. परिचारिका सेवा देखील त्याला आता अपवाद राहिलेली नाही. परिचारिका झोकून देऊन काम करीत असल्या तरी अद्यापही त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात परिचारिकांची संख्या अत्यंत कमी आहे. रूग्णालयांमध्ये परिचारिकांची मागणी मोठ्या प्रमाणावर असली तरी त्यातुलनेत पुरवठा अत्यंत कमी आहे. शासकीय रूग्णालयात परिचारिकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत, ती शासनस्तरावर भरली गेलेली नाहीत. या रिक्त पदांचा ताण परिचारिकांवर येत आहे. परिचारिकांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नाहीत. अकरा महिन्याच्या करारावर परिचारिकांना ठेवले जात आहे. शिक्षण, नोकरी, पदे अशा सर्वस्तरावर परिचारिकांची गळचेपी सुरू आहे. मग परिचारिकांनी सेवा द्यायची कशी? असा सवाल उपस्थित करीत या समस्यांमुळे पैशांसाठी परिचारिकांचा ओढा परदेशाकडे वाढला असल्याची माहिती महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा सुमन टिळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आज खासगी रूग्णालयात केरळच्या परिचारिका मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. कारण या नर्सेस सर्वप्रकारचे काम करण्यास तयार असतात. दुस-या राज्यातून परिचारिका आणण्यासाठी एजन्सी आणि एजंट आहेत. दोन वर्षे त्यांचे खासगी रूग्णालयात टेÑनिंग पूर्ण झाल्यानंतर या परिचारिकांना परदेशात पाठविले जाते. पुण्यातही अशा काही एजन्सी आहेत ज्या खासगी क्लासेसच्या माध्यमातून परिचारिकांना शिक्षण देतात. त्यानंतर त्यांची परीक्षा घेत त्यामधील चांगल्या परिचारिकांची निवड करीत त्यांना परदेशाची स्वप्ने दाखविली जातात. शासकीय रूग्णालयातील अनेक स्टाफ परिचारिका याला भुलल्या आहेत. त्यांची परीक्षा देऊन परदेशात नव-यालाही नोकरी देण्यात आली आहे. मात्र काहींच्या पदरी अपयश देखील आले आहे. बीएससी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या काही परिचारिकांचा कल देखील परदेशात नोकरी करण्याकडे वाढत आहे. या एजंन्सीच्या माध्यमातून परदेशातील खासगी रूग्णालयात त्यांना नोकरी दिली जाते. त्यांची राहाण्याची-खाण्यापिण्याची सोय केली जाते. शासकीय आणि खासगी रूग्णालयातील सेवेपेक्षा त्यांना चांगले पैसे मिळत असल्याने परिचारिकांची पावले परदेशाकडे वळली आहेत. काही वर्षांपूर्वी एक एजन्सी आमच्या अध्यक्षांकडे आली होती. आम्हाला काही परिचारिका मिळतील का? मात्र त्यांनी नकार दिला होता. आता परिचारिका ही सेवा राहिली नसून, तो एक धंदा झाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
--------------
नोकरी आणि पैसा याचा विचार करून नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी परदेशी जाण्यास प्राधान्य देतात. हे खरं आहे. वर्षातून किमान दहा मुले परदेशात जात आहेत- सावता विठोबा माळी, प्रशासकीय अधिकारी, सिहंगड कॉलेज आॅफ नर्सिंग