गावपळणीसाठी शिराळे वेशीबाहेर
By Admin | Published: January 8, 2015 11:39 PM2015-01-08T23:39:48+5:302015-01-09T00:28:22+5:30
वार्षिक उत्सव : शाळा भरते झाडाखाली; वास्तव्य राहुट्यांमध्ये
वैभववाडी : वार्षिक गावपळणीमुळे शिराळेवासीय सडुरे गावच्या हद्दीतील राहुट्यांमध्ये दाखल झाले आहेत. पुढील पाच दिवसांत ग्रामदेवता श्री गांगोचा कौल घेऊन ते पुन्हा शिराळेत परततील. या काळात निसर्गाशी समरस होऊन ज्ञानार्जनाचा अनुभव चिमुकली बालके घेणार आहेत.शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा साडेचारशे वर्षांपासून चालत आली आहे. गावपळण हा ग्रामदेवतेचा आदेश मानून शिराळेवासीय मोठ्या श्रद्धेने दरवर्षी पाच ते सात दिवस गाव सोडतात. गावपळणीचा कौल होण्याआधीच सडुरेच्या हद्दीतील नेहमीच्या जागी झाडांच्या डहाळ्यांपासून राहुट्या उभारून ठेवतात. गावपळणीचा कौल होताच शिराळेचे ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात गाव सोडले आहे.शिराळे बनलेय सुने सुने गावपळणीला निघताना गुरेढोरे यांच्यासह शिराळेवासीय सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतर चालून सडुरेत दाखल झाले आहेत. गावात परतण्याचा कौल होईपर्यंत शिराळे गाव पुरते सुने सुने बनले आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राणीही शिराळेच्या हद्दीत फिरकत नाहीत. गावपळणीच्या दिवसात शिराळेवासीयांची दैनंदिनी राहुट्यांमधून सुरू असल्याचे दिसते. अगदी गुण्यागोविंदाने राहुट्यांमध्ये राहणाऱ्या शिराळेवासीयांच्या चेहऱ्यावर गावपळणीचा आनंद अक्षरश: ओसंडून वाहताना दिसतो.
शाळा भरते झाडाखाली
गावपळणीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली शिराळेची शाळा भरते. इतर दिवशी चार भिंतींमध्ये धडे गिरवत कवी कल्पनेतील निसर्ग समजावून घेणारी बालके गावपळणीच्या निमित्ताने निसर्गाशी समरस होऊन गेलेली दिसतात. प्रार्थना, पोषण आहार सारे काही झाडाखालीच होत असल्याने विद्यार्थीही उत्साही दिसतात.शिराळे हे महसूल गाव असून, ते वैभववाडी तालुक्यात आहे. दरवर्षी गावपळण होते. यापूर्वी एक महिना गावपळण होत होते; परंतु आता पाच दिवसांवर आला आहे.गावपळणीला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे. ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात.
घोरीप खेळाने होते सांगता
वार्षिक गावपळणी पार पाडून गावात परतल्यावर मानकरी ग्रामदेवतेकडे कौल घेऊन नाडेघोरीप खेळाची तयारी करतात. त्यादिवशी संपूर्ण रात्र जागून पारंपरिक पद्धतीने नाडेघोरीप सादर करतात.
तसेच या खेळानिमित्त गावकरी रात्रीचे सामूहिक भोजन करतात. त्यामुळे गावपळणीनंतरचे नाडेघोरीप हे शिराळेवासीयांसाठी पर्वणीच ठरते. हा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावचे लोकही शिराळेत जातात. नाडेघोरीप खेळ झाल्याखेरीज गावपळणीचे वार्षिक पूर्ण होत नाही, असा तेथील रयतेचा पूर्वापार समज आहे.