पवार मोठे नेते, मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा- निरंजन डावखरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 11:41 AM2018-05-24T11:41:33+5:302018-05-24T11:41:33+5:30
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेले दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेले दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी निरंजन डावखरे यांनीही राष्ट्रवादीत होत असलेल्या कोंडमा-याला वाट मोकळी करून दिली. स्थानिक नेत्यांकडून काम करताना त्रास होत होता म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवार हे मोठे नेते आहेत. तरी मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा आहे. मुख्यमंत्री सातत्यानं माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या 10 वर्षांपासून मी राजकारणात काम करतोय. मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वात मला आणखी चांगलं काम करता येईल, असंही निरंजन डावखरे म्हणाले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही काल राजीनामा दिला. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा काल सुपूर्द केला होता.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला होता. दिवंगत वसंत डावखरे यांना मानणारा एक मोठा वर्ग पालघर, ठाणे जिल्ह्यात आहे. तो भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपाला ठाणे पट्ट्यात एक तरुण चेहरा लाभणार असल्याने भाजपा नेतेही डावखरेंच्या पक्षप्रवेशासाठी सकारात्मक आहेत.