'लोकांनी तुम्हाला राम मंदिर बांधायला निवडून दिलेय, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 08:59 AM2018-02-10T08:59:08+5:302018-02-10T09:00:58+5:30
जीएसटी’साठी मध्यरात्री संसदेत बैठक होते मग राम मंदिरासाठी का नाही?
परभणी: देशातील जनेतेने अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भाजपाला निवडून दिलेय, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे, अशा शब्दांत विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडीया यांनी सरकारवर हल्ला चढवला. तोगडीया हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. ते शुक्रवारी परभणी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदी आणि सरकारला लक्ष्य केले.‘जीएसटी’साठी मध्यरात्री संसदेत बैठक होते मग राम मंदिरासाठी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकार कोणाचेही येवो; पण राममंदिर झाले पाहिजे. कारण आम्हाला राम मंदिर प्रिय आहे, असे तोगडीया यांनी सांगितले.
मात्र, आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. परंतु राम मंदिराच्या उभारणीत येणारे अडथळे पाहता त्यासाठी सरकारने संसदेत कायदाच मंजूर केला पाहिजे. त्यामुळे राम मंदिराची उभारणी त्वरेने पूर्ण होईल. मात्र, या मंदिराच्या बाजूला मशिद असू नये, अशी मागणीही तोगडीया यांनी केली. देशामध्ये हिंदू अल्पसंख्याक होण्याची भीती आहे. अशावेळी सत्तास्थानी हिंदूच असले पाहिजेत. पंतप्रधानांसारख्या जबाबदारीच्या पदावर हिंदू व्यक्तीच विराजमान व्हावी मग भलेही ती कोणत्या का पक्षाची असेना, असेही तोगडीया यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. तोगडीया हे बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रकाश लाखरा यांच्या विवाहासाठी येथे आले होते. औरंगाबादहून येथे आल्यानंतर दत्त नगरातील प्रल्हाद कानडे यांच्या निवासस्थानी त्यांनी शहरातील व्यापारी व इतर घटकांशी संवाद साधला.
काही दिवसांपूर्वी एका खटल्याप्रकरणी पोलीस तोगडीया यांना अहमदाबादमध्ये अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी तोगडिया संपूर्ण दिवस गायब झाले होते. त्यानंतर ते एका रुग्णालयात बेशुद्धाअवस्थेत सापडले होते. या घटनेनंतर तोगडिया यांनी राजस्थान पोलिसांना आपला एन्काऊंटर करायचा होता, असा आरोप केला होता. या घटनेनंतर पोलिसांकडून त्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच औरंगाबादच्या दौऱ्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी 700 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये तोगडिया यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी एका विशेष पोलीस पथकासह 2 जिल्हा पोलीस अधिक्षक, 4 पोलीस सहआयुक्त, 17 पोलीस निरीक्षक, 24 सह पोलीस निरीक्षक आणि 300 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.