मुख्यमंत्र्याच्या जवळच्या लोकांकडून आरक्षणाविरोधात याचिका म्हणजे फसवाफसवी : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:13 PM2019-04-17T12:13:51+5:302019-04-17T12:20:40+5:30
धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवायचे आणि घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकणार नाहीत, अशी भूमिका या सरकारने घेतली आहे.
बारामती : धनगर, मराठा, मुस्लीम आरक्षणाचा निर्णय घेतो म्हणून झुलवत ठेवायचे आणि घेतलेले कोणतेच निर्णय कोर्टात टिकणार नाहीत, अशी भूमिका या सरकारने घेतली आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील नागपूरचे आहेत.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्याचे अॅड. जनरल नेमले होतं. त्यांनी नंतर राजीनामा दिला वकिली सुरू केली. वकिली करण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण मुख्यमंत्र्याच्या जवळचे लोक आरक्षणाविरोधात याचिका दाखल करतात. ही फसवाफसवी असल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
बारामती येथे पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मागील निवडणुकीत अच्छे दिनचे आश्वासन देणारे पंतप्रधान आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करीत आहेत. राष्ट्रवादाचे प्रश्न काढून मूळ विषयाला विचलित करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांपासून त्यांचे सारे सहकारी करीत आहेत, हे निषेधार्ह आहे.मुळात बुलढाण्यात राठोड नावाचे जवान शहीद झाले, त्यांच्या अंत्यविधीवेळी पंतप्रधान तेथून अवघ्या ४० किलोमीटरवर होते. देशासाठी शहीद झालेल्या जवानाला, त्याच्या कुटुंबियांना भेटावे, कुटुंबियांचे सांत्वन करावे, असे त्यांना त्यावेळी वाटले नाही. मात्र, आता या जवानांच्या शौर्याचा लाभ राजकारणासाठी ते करीत फिरत आहेत. त्यांच्या नावावर मते मागत आहेत.
लोकांचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानविरुध्द टोकाची भूमिका
मोदी सातत्याने पाकिस्तानविरोधात मी चॅम्पियन आहे, असे म्हणतात. पण लोकांची भावना एका दिशेने नेण्याचा प्रयत्न आणि दुसºया बाजूने पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी संबंध, असे दुहेरी ते वागतात. आताच्या पंतप्रधानांशी त्यांचे कसे संबंध आहेत, हे मला सांगता येणार नाही. मात्र त्यांच्या या संबंधांवरून मला एक वाचनात आलेली गोष्ट आठवली. दोन राष्ट्रात कटुता होती, तेव्हा सत्ता टिकवण्यासाठी आम्ही काय करतो हे सांगताना त्यापैकी एका राष्ट्रप्रमुखाने स्टेटमेंट दिले होते की, आम्हाला संधी मिळेल तेव्हा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एकदम टोकाची भूमिका घेतो आणि सत्ता हातात ठेवतो. खरेतर सध्याची स्थिती पाहता ,असे काही चित्र येथे चालले आहे, अशी शंका येथे येऊ शकेल अशी स्थिती असल्याचा टोला शरद पवार यांनी लगावला.