पिंपरी: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या तरूणीला गर्भपात करण्यास दिला नकार, डॉक्टरवर दवाखान्यात घुसून कोयत्याने वार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 11:57 AM2017-09-10T11:57:52+5:302017-09-10T11:59:34+5:30
पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला.
पिंपरी, दि. 10 - पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला. शनिवारी रात्री ही घटना घडली असून, हल्लेखोरांनी डॉक्टरवर कोयत्याने वार केले.
पिंपळे गुरव येथे काटे पुरम चौकात डॉ. अमोल बिडकर यांचे रुग्णालय आहे. एका युवतीला घेऊन एकजण काही दिवसांपूर्वी डॉ. बिडकर यांच्याकडे आला होता. युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असेल तर कायद्याने गर्भपात करता येणार नाही. गर्भ 20 आठवड्यांचा असल्याने गर्भपात करू शकत नाही, असे डॉक्टरांनी सांगून डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. हे प्रेमीयुगूल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची माहिती आहे.
याचा राग आल्याने शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तिघेजण मोटारीतून बिडकर यांच्या दवाखान्याजवळ आले. एकजण दवाखान्याबाहेर थांबला. दुसरा डॉक्टरांच्या कॅबिनच्या दरवाजावर थांबला.तिसऱ्याने आत जाऊन डॉक्टरांवर कोयत्याने वार केले. डॉक्टरांच्या हातात मोबाईल होता. त्यांनी हात पुढे केला मोबाईलवर वार झेलल्याने मोबाईल फुटला.त्यांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली. खांद्यावर केलेला वार त्यांनी चुकवल्यामुळे ते बचावले.
या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य सांगवी पोलिस ठाण्यासमोर आज रविवारी सकाळी जमले. आरोपींवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करन्यात आली आहे