सांगलीत मृत गर्भाला ठरविले जिवंत, महापालिका प्रसूतिगृहाचा अनागोंदी कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 08:11 PM2017-10-06T20:11:48+5:302017-10-06T20:12:02+5:30
महापालिकेच्या प्रसूतिगृहातील कारभाराचा अजब नमुनाच शुक्रवारी महासभेत नगरसेवकांनी सादर केला. एका गरोदर महिलेचा गर्भ तीन आठवड्यापूर्वी मृत झाला असतानाही प्रसुतीगृहाने मात्र तो जिवंत असल्याचा शोध लावला.
सांगली : महापालिकेच्या प्रसूतिगृहातील कारभाराचा अजब नमुनाच शुक्रवारी महासभेत नगरसेवकांनी सादर केला. एका गरोदर महिलेचा गर्भ तीन आठवड्यापूर्वी मृत झाला असतानाही प्रसूतिगृहाने मात्र तो जिवंत असल्याचा शोध लावला. हा प्रकार संबंधित महिलेच्या जीवावर बेतला असता. पण त्यांनी वेळीच खासगी रुग्णालयात धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचविण्यात यश आले. या प्रकरणाचा सदस्यांनी पंचनामा करून चौकशी मागणी केली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.
महापालिकेच्या महासभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज गायकवाड यांनी प्रसुतीगृहातील ढिसाळ कारभाराचा पंचनामा केला. त्यांच्या वार्डातील एक महिलेच्या जीवावर बेतलेला प्रसंग सांगताच संपूर्ण सभागृह आवाक झाले. गायकवाड म्हणाले की, वार्डातील एक गर्भवती महिला तपासण्यांसाठी महापालिकेच्या प्रसूतिगृहात नियमित येत होती. काही दिवसापूर्वी ती तपासणीसाठी प्रसूतिगृहात आल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफीचा अहवाल पाहून प्रसूतिगृहातील डॉक्टरांनी गर्भाची वाढ व्यवस्थित असल्याचे सांगितले. त्यानंतर दुस-याच दिवशी या महिलेच्या पोटात दुखू लागले.
तिच्या नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तिथे तपासणी केली असता तीन आठवड्यापूर्वीच बालक मृत झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर शस्त्रक्रिया करून मृत गर्भ काढण्यात आला आणि या महिलेचा जीव वाचला. महापालिकेच्या प्रसुतीगृहातील डॉक्टरांवर भरवशावर संबंधित महिला व तिचे नातेवाईक बसले असते तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. या हलगर्जीपणाला जबाबदार असणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी याबाबत आयुक्त खेबूडकर यांच्याकडे लेखी तक्रारही केली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तसेच काही पुरावेही त्यांनी सभेत महापौर हारूण शिकलगार व आयुक्त खेबूडकर यांच्याकडे दिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याची ग्वाही सभेला दिली.
दरम्यान सभेत प्रसूतिगृहातील असुविधांबाबत नगरसेविका मृणाल पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. स्वच्छतागृहे, गळक्या इमारती, सीसी टीव्ही कॅमेरे आदींची वाणवा असल्याचाही आरोप केला. प्रियांका बंडगर, शुभांगी देवमाने, अनारकली कुरणे आदींनी संताप व्यक्त केला. गटनेते किशोर जामदार म्हणाले, आयमएतर्फे प्रशिक्षणार्थी संबंधित डॉक्टर कृत्रिम प्रसूतीसाठी काम करायला तयार आहेत. तसे प्रस्ताव देऊनही सहा-सहा महिने निर्णय होत नाहीत. यावर खेबुडकर यांनी लवकरच यावर निर्णय घेऊ, असे जाहीर केले. परंतु गौतम पवार म्हणाले, प्रसुतीसारख्या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी प्रशिक्षणार्थींचा खेळ नको. तज्ज्ञांचीही नियुक्ती करू. यावेळी श्री. खेबुडकर यांनी महापालिकेमार्फत प्रसुतीतज्ज्ञ, फिजिशियन तसेच भूलतज्ज्ञ भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले.